
पुणे, 25 नोव्हेंबर, (हिं.स.)। कात्रज चौक ते नवले पूल या दरम्यान महापालिकेच्या २००८ च्या विकास आराखड्यात (डीपी) समावेश असलेला १२ मीटर रुंदीचा सेवा रस्ता (सर्व्हिस रोड) अद्यापही कागदावरच आहे. रस्त्याच्या जागेवर बांधकामे आणि विविध प्रकारे व्यवसाय थाटण्यात आले आहेत. दरम्यान, ही जागा ताब्यात घेण्यासाठी महापालिकेला अडीचशे ते तीनशे कोटींची गरज लागणार आहे. मात्र, मुंबई-बंगळुरू महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी नऱ्हे ते वडगाव पूल या दरम्यानच्या सेवा रस्त्याचे भूसंपादन करण्यास सध्या तरी महापालिकेचे प्राधान्य असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग नवीन बोगद्यातून सरळ केल्यानंतर कात्रज-देहूरोड बायपास अंतर्गत असलेला कात्रज चौक ते नवले पूल अनेक वर्षे दुर्लक्षित होता. पश्चिम, दक्षिण आणि मध्य शहराला जोडणाऱ्या या महत्त्वाचा रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) ताब्यात असलेला हा रस्ता महापालिकेकडे देण्यात आला. मात्र, हा रस्ता एनएचएआयने विकसित करावा, अशी मागणी केली जात होती. त्या मागणीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मान्यता दिली. यामुळे एनएचएआयमार्फत रस्त्याचे सहा पदरीकरण आणि कात्रज चौकात उड्डाणपूल ही कामे केली जात आहेत.
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु