
लातूर, 25 नोव्हेंबर (हिं.स.)
केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनेच्या माध्यमातून लातूर शहरात वेगवेगळ्या विकास कामांना निधी उपलब्ध झाले आहे. यामधील काही काम सुरु असून काही कामे प्रास्ताविक आहेत. या सर्व विकास कामांना गती मिळून ती कामे तातडीने पुर्ण व्हावे अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर व शहर निवडणूक प्रमुख अर्चना पाटील चाकूरकर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने मनपा आयुक्त मानसी मीना यांच्याकडे केली आहे.
लातूर शहराच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकारच्या वतीने वेळोवेळी पाठपुरावा करून विविध योजनांच्या अंतर्गत अनेक विकास कामे मंजूर करण्यात आलेली आहेत. या विकास कामांना निधी सुद्धा उपलब्ध होत आहे. यामध्ये शहरातील अंतर्गत भुयारी गटारीचे काम, स्टॅच्यु ऑफ नॉलेज अर्थात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ७५ फुटी पुतळ्याचे काम, शादिखाना व नाट्यगृह बांधकाम, अमृत अभियान अंतर्गत दुसऱ्या टप्प्याचे काम तसेच शहरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती या कामांचा समावेश आहे. या बरोबरच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह उभारणी, मिनी मार्केट जवळ वस्ताद लहूजी साळवे यांचा पुतळा उभारणे, कन्हेरी परिसरात असलेल्या लिंगायत स्मशानभूमी प्रश्न, मातोश्री वृद्धश्रम नजीक असलेल्या स्मशानभूमिसह शहरातील इतर स्मशानभूमीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करून देणे आदी कामे प्रास्ताविक आहेत. हि सर्व विकास कामे लातूर व लातूरकरांच्या हिताची असून हि कामे वेळेत व जलद गतीने पुर्ण होणे आवश्यक आहे. यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे आवश्यक असणारा पाठपुरावा हि करण्यात येत असल्याचे सांगून मनपा प्रशासनाने हि कामे दर्जेदार व वेळेत होण्यासाठी आवश्यक ठोस पाउले उचलणे गरजेचे असल्याचे शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी निदर्शनास आणून दिली आहे.
या विकास कामांबाबत मनपा प्रशासन गंभीर असून हि कामे वेळेत पुर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे आयुक्त मानसी मीना यांनी सांगितले. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी वाहतूक कोंडीच्या समस्येकडे लक्ष वेधत याबाबत मनपा प्रशासनाने आराखडा तयार करावा अशी मागणी केली. हि सर्व विकास कामे दर्जेदार व्हावी याकडेही मनपा प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे अशी सूचना अजित पाटील कव्हेकर यांनी केली. मनपातील बहुतांश सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम मिळालेली नाही. हि रक्कम लवकरात लवकर त्या कर्मचाऱ्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना मिळावी यासाठी मनपाने विशेष लक्ष देऊन कार्यवाही करावी अशी मागणी यावेळी करण्यात आलेली आहे.
या शिष्टमंडळात सरचिटणीस संजय गीर, प्रविण कस्तुरे, निखील गायकवाड, मंडल अध्यक्ष विशाल हवा पाटील, रोहित पाटील, राहुल भुतडा, काका चौगुले, माजी नगरसेवक शैलेश स्वामी, सुनील मलवाड, स्वाती घोरपडे, श्वेता लोंढे, शोभा पाटील, दिपा गित्ते, आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा समावेश होता.
---------------
हिंदुस्थान समाचार