
पुणे, 25 नोव्हेंबर (हिं.स.) - शहर खड्डेमुक्त करण्याचे दावे वारंवार केले जात असले तरी प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी असल्याची तक्रार नागरिक करत असताना, अखेर महानगरपालिका प्रशासनाने रस्त्यांच्या कामांवर कडक लगाम घालण्याचा निर्णय घेतला आहे. खड्डे बुजवण्याची आणि रीसर्फेसिंगची कामे नेमकी कुठे झाली याची पारदर्शक नोंद रहावी म्हणून रस्तानिहाय आणि रुंदीनिहाय माहिती जीआयएस प्रणालीमध्ये भरावी, असे आदेश अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी पथ विभागाला दिले आहेत.
आयुक्त नवल किशोर राम यांच्या खड्डेमुक्त संकल्पनेअंतर्गत कामे सुरू असली, तरी अनेक ठिकाणी झालेले काम कागदोपत्री दाखवले जात असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या. यामुळे कामांची अचूकता तपासण्यासाठी जीआयएसचा अनिवार्य वापर लागू करण्यात आला आहे. कोणत्या रस्त्यावर किती काम झाले, किती चौरस मिटर दुरुस्ती झाली आणि खड्डे नेमके कुठे बुजवले गेले याची माहिती रोजच्या रोज प्रणालीवर अपलोड करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु