
अमरावती, 25 नोव्हेंबर (हिं.स.)। अमरावतीच्या धारणी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील चोथमल आणि धारणीमधील भाजपच्या सर्व उमेदवारांच्या प्रचार सभेत माजी खासदार नवनीत राणा
यांनी मी पुन्हा येईन, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर पुन्हा खासदार होण्याची इच्छा व्यक्त केली. तर आमची माजी खासदार आता तुमच्या आशीर्वादाने माजी खासदार राहणार नाही, असे म्हणत नवनीत राणांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी दुजोरा दिलाय. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दादा आता मलाही म्हणायची वेळ आली आहे की, मी पुन्हा येईन, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच नवनीत राणा यांनी पुन्हा खासदार होण्याची इच्छा व्यक्त केली. बेटी को लाना है वापस की नही लाना है, दादा पराभव झाल्यानंतरही आम्ही खूप कष्ट करून इथपर्यंत प्रचारासाठी आलो. देवेंद्र भाऊ, देवा भाऊ म्हणून तुम्ही महिलांच्या पाठीशी आहात. त्यांच्या डोक्यावर तुमचा हात आहे, असे वक्तव्य नवनीत राणा यांनी केले आहे.
तर नवनीत राणांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी देखील दुजोरा दिल्याचे पाहायला मिळाले. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तुमच्या आशीर्वादाने नवनीत राणा आता माजी खासदार राहणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्राचे प्रवेशद्वार असलेल्या धारणीत मी आलो आहे. मी म्हटले की मला धारणीत सभा करायची आहे. मी धारणीमधून सर्व अमरावती जिल्ह्याला सांगायला आलो की, भाजपला ही निवडणूक द्या. या लोकांच्या जीवनात परिवर्तन झालं पाहिजे. धारणीमधील 52 कोटीची योजना असेल किंवा चिखलदरामध्ये 55 कोटीची पाण्याची योजना मोदी सरकार आणि महाराष्ट्र सरकारने दिली. घराघरात आम्ही पाणी पोहचवणार आहोत. प्रत्येक शहारात आम्ही बंद गटार लाईन टाकणार आहोत. ते पाणी नदीत जाणार नाही. त्यावर आम्ही प्रक्रिया करू, असे त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी