
पिंपरी, 25 नोव्हेंबर, (हिं.स.) - पिंपरी चिंचवड शहरात स्वच्छता आणि सौंदर्यनिर्मिती यांचा सुंदर मिलाफ अनुभवायला मिळत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने ‘टाकाऊ वस्तूंपासून सर्जनशीलता’ या संकल्पनेला नवचैतन्य देत, शहरातील टाकाऊ वस्तूंमधून आकर्षक कलाकृती निर्मितीचा उपक्रम मोठ्या उत्साहात राबवला आहे. या कलाकृती केवळ नजरेत भरणाऱ्या नसून पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छता उपक्रमास देखील चालना देणाऱ्या ठरत आहेत.
शहरातील विविध कचरा संवेदनशील ठिकाणी हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला आहे. यामध्ये ब क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग १७ बिजलीनगर, प्रभाग २२ शांती चौक काळेवाडी तसेच , इ क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग ०५ सखुबाई गवळी उद्यान, आळंदी रोड, भोसरी येथे असलेली संवेदनशील ठिकाणे आता रंगतदार, देखण्या कलाकृतींनी सुशोभित झाली आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सफाई सेवकांनी केवळ स्वच्छता न करता, टाकाऊ टायर, प्लास्टिकचे डबे, बाटल्या, लोखंडी फ्रेम्स, पाइप्स यांसारख्या वस्तूंचा कल्पकतेने उपयोग करून उद्याने, रस्त्याकडील जागा आणि सार्वजनिक ठिकाणांचे सुशोभीकरण केले. त्यांच्या कल्पकता आणि मेहनतीमुळे शहरात सौंदर्याची नवी उधळण झाली आहे. या उपक्रमासाठी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, आरोग्य विभाग प्रमुख व उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, आरोग्य कार्यकारी अधिकारी व सहायक आयुक्त अमित पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आरोग्य अधिकारी राजेश भाट, सुधीर वाघमारे, श्रीराम गायकवाड, मुख्य आरोग्य निरीक्षक अतुल सोनवणे, भूषण शिंदे, आरोग्य निरीक्षक रूपाली साळवे, मुकेश जगताप आणि विकास शिरवाळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
-------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु