रत्नागिरी : शिरगाव व एमआयडीसी उपकेंद्र वीजपुरवठा दोन तासांत सुरळीत
रत्नागिरी, 25 नोव्हेंबर, (हिं. स.) : महावितरणचे कर्मचारी वीज ग्राहकांच्या सेवेत अविरत कार्यरत असतात. याचीच प्रचीती पुन्हा एकदा चिपळूण परिसरातील वीज ग्राहकांनी घेतली. तांत्रिक बिघाड झाल्याने शिरगाव व एमआयडीसी उपकेंद्रांचा बाधित झाला होता. यामुळे सुम
रत्नागिरी : शिरगाव व एमआयडीसी उपकेंद्र वीजपुरवठा दोन तासांत सुरळीत


रत्नागिरी, 25 नोव्हेंबर, (हिं. स.) : महावितरणचे कर्मचारी वीज ग्राहकांच्या सेवेत अविरत कार्यरत असतात. याचीच प्रचीती पुन्हा एकदा चिपळूण परिसरातील वीज ग्राहकांनी घेतली. तांत्रिक बिघाड झाल्याने शिरगाव व एमआयडीसी उपकेंद्रांचा बाधित झाला होता. यामुळे सुमारे १५ हजार घरगुती, वाणिज्य व औद्योगिक ग्राहक व सुमारे ७५० उच्चदाब ग्राहक यांचा वीजपुरवठा बाधित झाला होता. मात्र महावितरण कर्मचाऱ्यांनी या सर्व ग्राहकांचा वीजपुरवठा अवघ्या दोन तासांत पूर्ववत केला.

उपविभाग चिपळूण ग्रामीण विभागात पेढांबे परिसरात २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता महावितरणच्या २२० केव्ही लाइनवर तांत्रिक बिघाडाची घटना घडली. २२० केव्ही सर्किटच्या टॉवरवरील अर्थिंग वायर तुटून ती थेट ११ केव्ही शिरगाव व कोळकेवाडी फिडरवर कोसळली. या घटनेत दोन्ही फिडरचे ११ केव्ही कंडक्टर तुटून वीजपुरवठा बाधित झाला. यामुळे शिरगाव उपकेंद्राबरोबरच एमआयडीसी उपकेंद्र पूर्णपणे प्रभावित झाले.

बिघाड दुरुस्त करणे आव्हानात्मक असतानाही महावितरणच्या पथकाने तत्काळ परिस्थिती हाताळत पर्यायी मार्गांचा वापर करून वीजपुरवठा सुरू केला. ४०० केव्ही उपकेंद्रातून निघणाऱ्या ३३ केव्ही शिरगाव फिडरवरून प्रथम एमआयडीसी उपकेंद्र पुन्हा कार्यान्वित करण्यात आले व उपकेंद्रातील फिडर टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आले. पुढे ३३ केव्ही एक्सप्रेस फिडर पूर्ण क्षमतेने चालू करण्यात आला. कोळकेवाडी व शिरगाव फिडरवरील काही भाग पर्यायी मार्गाने वीजपुरवठा सुरू करण्यात आला.

महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या समन्वय आणि तत्परतेमुळे अवघ्या दोन तासांत शिरगाव सेक्शनचा संपूर्ण वीजपुरवठा सुरळित करण्यात यश आले. या कार्यात शिरगाव व एमआयडीसी सेक्शनच्या कर्मचाऱ्यांनी अत्यंत प्रभावी कामगिरी बजावली. घटनास्थळी उपकार्यकारी अभियंता सचिन पाटणकर (चिपळूण), शाखा अभियंते तेजश्री उगारे (शिरगाव) व अमोल मोहिते (धामणंद) यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. या मोहिमेत चिपळूण विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय भामरे हे सर्व घटनांवर बारकाईने लक्ष ठेवून होते.

अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे वीजपुरवठा अल्पावधीतच पूर्ववत करण्यात यश आले. अचानक खंडित झालेला वीजपुरवठा अल्पावधीत सुरळित झाल्याने परिसरातील नागरिकांसह एमआयडीसीतील ग्राहकांनी महावितरण पथकाचे कौतुक करून त्यांचे आभार मानले. तसेच या मोहिमेत कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कोकण परिमंडलाचे मुख्य अभियंता अनिल डोये व रत्नागिरी मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता सुनीलकुमार माने यांनी कौतुक केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande