
जळगाव , 25 नोव्हेंबर (हिं.स.) खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित इन्स्टिट्यूट ऑफ मेनेजमेंट एंड रिसर्च (आयएमआर)चे प्राध्यापक आणि जळगावचे लेखक पुनीत शर्मा लिखित ‘फ्रॉम डाऊट टू धर्म: फाइंडिंग स्टीलनेस अँड स्ट्रेंथ थ्रू द टीचिंग्ज ऑफ रामायण, महाभारत अँड उपनिषद’ हे पुस्तक नुकतेच प्रदर्शित झाले आहे. ‘हे हाउस–पेंग्विन रँडम पब्लिकेशन्सने’ या पुस्तकाला जागतिक व्यासपीठ दिले असून, भारताबरोबरच अमेरिका, ब्रिटेन, कॅनडा, जर्मनी, ऑस्ट्रेलिया आणि ब्राझीलमध्येही ते एकाचवेळी प्रकाशित आणि उपलब्ध झाले आहे.
या पुस्तकाची प्रस्तावना केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सीए पियूष गोयल यांनी लिहिली आहे. तसेच प्रख्यात लेखक अश्विन सांघी, वैज्ञानिक आणि साहित्यिक डॉ. आनंद रंगनाथन, G20 शेर्पा अमिताभ कांत आणि आयआयटी मद्रासचे संचालक व्ही. कमलकोटी यांनी पुस्तकाचे कौतुक करत “उत्कृष्ट आणि प्रभावी” असे लिखित अभिप्राय व्यक्त केले आहेत. तर खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रद्यावंत नंदकुमार बेंडाळे ह्यांनी या पुस्तकाचे कौतुक केले तसेच समस्त प्रशस्त मंडळाने शुभेच्छा दिल्यात. इंग्रजी भाषेतील सेल्फ-हेल्प श्रेणीत मोडणारे ‘फ्रॉम डाऊट टू धर्म’ हे पुस्तक मनाच्या सूक्ष्म कार्यप्रणालीचे सुस्पष्ट आणि सोपे विश्लेषण मांडते. दैनंदिन जीवनात भेडसावणारी मनाची अस्वस्थता, भीती, तुलना, भ्रम, संकोच, निर्णयातील गोंधळ आणि अतिविचार या मुद्द्यांवर पुस्तकात अत्यंत वास्तववादी आणि स्वीकृत होणाऱ्या पद्धतीने चर्चा केली आहे. पुस्तकात एकूण १८ अध्याय असून, प्रत्येक अध्याय वाचकाला हळूहळू मनाच्या मूळ तत्त्वांपर्यंत घेऊन जातो. समस्यांचे बाह्य स्वरूप पाहण्याऐवजी त्यांची सुरुवात मनात कुठे होते, विचारांची दिशा कशी बदलते आणि स्थैर्याचा मार्ग कोणत्या प्रकारे तयार होतो, हे पुस्तक संरचितरीत्या स्पष्ट करते. रामायण, महाभारत आणि उपनिषदांतील कथा, पात्रे आणि तत्त्वज्ञान यांचा प्रभावीपणे उपयोग या पुस्तकात केलेला आहे.
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर