
रायगड, 25 नोव्हेंबर (हिं.स.)। सिडको विकसित करंजाडे वसाहतीमधील आरक्षित मैदान परवानाधारक तत्वावर खाजगी संस्थेकडे दिल्यामुळे नागरिकांना खेळण्यासाठी आणि फिरण्यासाठी मोकळी जागा उपलब्ध नव्हती. शिवाय या जागेवर आठवडी बाजार, महोत्सव यांसारख्या कार्यक्रमांमुळे परिसरातील रहिवाशांना सातत्याने गैरसोय होत होती. या समस्येचा पाठपुरावा करत करंजाडे शिवसेना (शिंदे गट)ने कोठारी इंटरनॅशनल स्कूल प्रशासनाशी चर्चा करून मैदान नागरिकांसाठी खुले करण्यास भाग पाडले.
शहरातील सेक्टर ३ मध्ये असलेल्या कोठारी इंटरनॅशनल स्कूलच्या व्यवस्थापक श्रीनिवास नायडू यांच्याशी झालेल्या चर्चेत, शाळेमागील मैदान डिसेंबरपासून रोज संध्याकाळी ४ नंतर सर्व नागरिकांसाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे करंजाडे सेक्टर १ ते ६ मधील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, ज्येष्ठ नागरिक, मुले आणि तरुणांसाठी ही जागा आता पुन्हा उपलब्ध होणार आहे.
ही महत्त्वाची मागणी पूर्ण करण्यासाठी शिवसेना (शिंदे गट)चे उपजिल्हाप्रमुख विनोद साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळाने पाठपुरावा केला. यामध्ये मिरेंद्र शहारे (करंजाडे शहरप्रमुख), राजाभाऊ नलवडे (करंजाडे S-4 शाखाप्रमुख), अंजु सिंग (महिला शहरप्रमुख), राहुल सुखसे (करंजाडे S-4 उपशाखाप्रमुख), समाधान परदेशी (वडघर शहरप्रमुख) आणि मोशीन पावसे (सोशल मीडिया उपतालुकाप्रमुख – उरण) यांचा समावेश होता.
राजाभाऊ नलवडे यांच्या पुढाकाराने झालेल्या या निर्णयामुळे करंजाडेतील नागरिकांच्या दीर्घकाळच्या मागणीची पूर्तता झाली असून परिसरातील क्रीडा व शारीरिक क्रियाकलापांना नवी चालना मिळणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके