
पुणे, 25 नोव्हेंबर, (हिं.स.) - उसाचा रास्त व किफायतशीर दर (एफआरपी) वाढण्यासोबतच साखरेची किमान विक्री किंमत (एमएसपी) वाढली पाहिजे. दोन्हींमध्ये सध्या तफावत झाल्याने कारखान्यांचे नुकसान होते. केंद्र सरकारकडे चार हजार १०० रुपये प्रती क्विंटल ‘एमएसपी’ची मागणी केली आहे. त्याचबरोबर ‘एफआरपी’, ‘एमएसपी’, इथेनॉल, सहवीज निर्मिती यांच्यात दरवाढ करताना सर्वांचा विचार एकत्रितपणे करण्याचाही प्रस्ताव केंद्राला दिला आहे,’’ असे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
पुण्यात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. महासंघाकडून सनदी लेखापालांमार्फत तयार करण्यात आलेला सर्व ताळेबंद केंद्रीय सहकार विभागाला दिल्याचे सांगत पाटील म्हणाले, ‘‘केंद्राकडून ‘एमएसपी’बाबत सविस्तर अहवाल मागविला होता. त्यानुसार रासायनिक खतांच्या वाढत्या किमती, ऊस तोडणीचा खर्च यासह इतर बाबींचा समावेश करत चार हजार १०० रुपये प्रती क्विंटल ‘एमएसपी’ची मागणी केली आहे. त्याचबरोबर सध्या इथेनॉलचा साखर उद्योगातील कोटा हा ६५० कोटी लिटर एवढा आहे, त्यामध्ये आणखी ५० कोटी लिटरची वाढ करण्याचीही प्रमुख मागणी करण्यात आली आहे. यामुळे वाढलेल्या साखर उत्पादनाचा समतोल राखला जाईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु