पनवेल स्थानकाबाहेर वाहतूक कोंडीचा भडका; प्रवाशांचे हाल वाढले
रायगड, 25 नोव्हेंबर (हिं.स.)। भविष्यातील वाहतुकीचे प्रमुख केंद्र मानले जाणारे पनवेल रेल्वे स्थानक सध्या वाहतूक व्यवस्थेच्या गंभीर समस्यांशी झुंजत आहे. स्थानकाबाहेरील जागेची कमतरता, रिक्षाचालकांची मनमानी, अतिक्रमण आणि नियोजनाचा अभाव यामुळे प्रवाशांन
पनवेल स्थानकाबाहेर वाहतूक कोंडीचा भडका; प्रवाशांचे हाल वाढले


रायगड, 25 नोव्हेंबर (हिं.स.)। भविष्यातील वाहतुकीचे प्रमुख केंद्र मानले जाणारे पनवेल रेल्वे स्थानक सध्या वाहतूक व्यवस्थेच्या गंभीर समस्यांशी झुंजत आहे. स्थानकाबाहेरील जागेची कमतरता, रिक्षाचालकांची मनमानी, अतिक्रमण आणि नियोजनाचा अभाव यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.

पनवेल हे मध्य रेल्वे, कोकण रेल्वे तसेच मुंबई उपनगरी मार्गावरील अत्यंत महत्त्वाचे स्थानक आहे. येथे सात फलाट असून चार उपनगरी आणि तीन लांब पल्ल्याच्या गाड्यांची नियमित वाहतूक होते. सिडकोमार्फत नव्या टर्मिनसचे काम वेगात सुरू असून भविष्यात पनवेल जंक्शनचा भार आणि महत्त्व दोन्ही वाढणार आहे. दादर, सीएसएमटी आणि एलटीटीवरील गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प उपयुक्त ठरणार असला, तरी सध्या परिस्थिती विपरीत दिशेने जात असल्याचे चित्र आहे.

दिल्ली-जेएनपीटी कॉरिडॉरमुळे स्थानकाबाहेरील वाहतूक कोंडी आणखी तीव्र झाली आहे. बस व रिक्षांसाठी निश्चित जागा नसल्याने वाहनवाटप विस्कळीत झाले आहे. परिणामी सकाळ-संध्याकाळ गर्दीच्या वेळी शेकडो प्रवाशांना स्थानकाबाहेरच अडथळ्यांना तोंड द्यावे लागत आहे.

स्थानकासमोरील पदपथांवर अतिक्रमण वाढले असून झोपडपट्टीधारकांनी उभारलेल्या दुकानांमुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून रस्त्यावर चालण्याची वेळ येत आहे. एका बाजूला अतिक्रमण आणि दुसऱ्या बाजूला अनियमित रिक्षावाहतूक यामुळे अपघाताचा धोका वाढल्याची तक्रार नागरिक सातत्याने करत आहेत.

या संदर्भात वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील म्हणाले, “पनवेल रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर वाहतूक शाखेचे कर्मचारी नेमले असून नियमित कारवाई केली जाते. लवकरच अतिक्रमण आणि अनियमित रिक्षावाहतुकीवर संयुक्त कारवाई करण्यात येणार आहे.” पनवेल जंक्शनचा दर्जा वाढण्यापूर्वी वाहतूक व्यवस्था सक्षम करणे अत्यावश्यक असून, या समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी प्रवाशांची मागणी जोर धरत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande