उद्धव ठाकरेंनी घेतली राऊतांची भेट
“लवकरच तलवार घेऊन मैदानात दिसतील” - उद्धव ठाकरे मुंबई, 25 नोव्हेंबर (हिं.स.)। महाराष्ट्राच्या राजकारणात आपली आक्रमक भूमिका, मर्मवेधी वक्तृत्व आणि विरोधकांवर टिपणाऱ्या वाक्चातुर्यामुळे वेगळं स्थान निर्माण करणारे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष
Uddhav Thackeray meets Sanjay Raut


“लवकरच तलवार घेऊन मैदानात दिसतील” - उद्धव ठाकरे

मुंबई, 25 नोव्हेंबर (हिं.स.)। महाराष्ट्राच्या राजकारणात आपली आक्रमक भूमिका, मर्मवेधी वक्तृत्व आणि विरोधकांवर टिपणाऱ्या वाक्चातुर्यामुळे वेगळं स्थान निर्माण करणारे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत हे सध्या आजारपणामुळे सक्तीच्या रजेवर आहेत. प्रकृतीत अचानक बिघाड झाल्याने डॉक्टरांनी त्यांना घराबाहेर जाण्यास मनाई केली असून ३१ ऑक्टोबरपासून ते पूर्णपणे घरातच विश्रांती घेत आहेत. अशा परिस्थितीत मंगळवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः भांडूप येथील ‘मैत्री’ बंगल्यावर जाऊन संजय राऊतांची भेट घेतली.

दुपारी दोनच्या सुमारास ठाकरे यांची कार राऊत यांच्या निवासस्थानी पोहोचताच आमदार सुनील राऊत यांनी त्यांचे स्वागत केले. या भेटीची माहिती समजताच राजकीय वर्तुळात काय चर्चा झाली असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यापूर्वी आज सकाळी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनीही संजय राऊतांची भेट घेतली होती.

संजय राऊत यांना दुर्धर आजार असल्याचे त्यांनी स्वतः सोशल मीडियावरून सांगितले होते. उपचार सुरू असून लवकरच बरे होईन, असेही त्यांनी स्पष्ट केले. गर्दीत मिसळू नये आणि बाहेर पडू नये, असा वैद्यकीय सल्ला असल्याचे त्यांनी नमूद केले होते.

दरम्यान, भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “हल्ली मी रोज संजय राऊतांना फोन करत नाही. मी आता सुनील राऊतलाच संजयच्या प्रकृतीबद्दल विचारण्यासाठी छळत असतो. खूप दिवसांनी भेट झाली, चांगलं वाटलं. आज संजय खूप फ्रेश दिसला. “लवकरच तो मैदानात दिसेल“. “नुसता दिसणार नाही तर तलवार घेऊन मैदानात उतरेल!” त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वातावरणात नवा उत्साह दिसून आला.

डॉक्टरांनी मनाई करूनही १७ नोव्हेंबर रोजी बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीला संजय राऊत यांनी बंधन झुगारले होते. शिवाजी पार्कवर जाऊन त्यांनी स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. संसर्ग टाळण्यासाठी मास्क लावलेला असला तरी त्यांच्या डोळ्यातील भाव आणि शरीरभाषा सांगत होती की, शिवसैनिकाची जिद्द अजूनही तेवढीच पेटलेली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande