अमरावतीत 9 महिन्यात 60 कुमारी मातांच्या प्रसूती
अमरावती, 3 नोव्हेंबर (हिं.स.)। अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातून एक अत्यंत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. जानेवारी ते सप्टेंबर 2025 या नऊ महिन्यांच्या कालावधीत तब्बल अठरा वर्षाखालील 60 अल्पवयीन मुलींची प्रसूती झाल्याची नोंद रुग्णालयात झाली आहे.
अमरावतीत 9 महिन्यात 60 कुमारी मातांच्या प्रसूती


अमरावती, 3 नोव्हेंबर (हिं.स.)। अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातून एक अत्यंत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. जानेवारी ते सप्टेंबर 2025 या नऊ महिन्यांच्या कालावधीत तब्बल अठरा वर्षाखालील 60 अल्पवयीन मुलींची प्रसूती झाल्याची नोंद रुग्णालयात झाली आहे. या मुलींवर कोवळ्या वयातच मातृत्व लादले गेले असून, बहुतेक प्रकरणांमध्ये लैंगिक अत्याचार आणि बालविवाहाची पार्श्वभूमी आढळून आली आहे.

रुग्णालय प्रशासनाकडून या सर्व प्रकरणांची माहिती पोलीस तसेच महिला व बालविकास विभागाला देण्यात आली आहे. संबंधित विभागांकडून प्रत्येक प्रकरणाचा स्वतंत्र तपास सुरू असून, काही ठिकाणी गुन्हे नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेने जिल्ह्यातील सामाजिक आणि शैक्षणिक परिस्थितीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

विशेष म्हणजे, मेळघाट परिसरातील आदिवासी भागांमध्ये ही प्रकरणे अधिक प्रमाणात आढळून आली आहेत. या भागात आजही शिक्षणाचा अभाव, सामाजिक जागृतीचा अभाव तसेच आरोग्यविषयक सेवांचा अभाव जाणवतो. अनेक ठिकाणी शासनाच्या योजना आणि जनजागृती कार्यक्रम पोहोचलेले नाहीत. त्यामुळे अल्पवयीन विवाहाचे प्रमाण आजही टिकून असून, त्यातूनच या मुली अकाली मातृत्वाच्या गर्तेत ओढल्या जात आहेत.

या प्रकरणांमुळे जिल्हा प्रशासन, महिला व बालविकास विभाग तसेच समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन बालविवाह व लैंगिक अत्याचाराविरुद्ध कठोर पावले उचलण्याची गरज अधोरेखित झाली आहे. या मुलींच्या पुनर्वसनासाठी आणि शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ठोस उपक्रम राबवले नाहीत, तर अशी अमानुष वास्तवं पुन्हा पुन्हा उघडकीस येत राहतील.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande