
अमरावती, 3 नोव्हेंबर (हिं.स.)। अमरावती येथे झालेल्या महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेच्या राज्यस्तरीय संमेलनात दोन महत्त्वाचे ठराव पारित करण्यात आले आहेत. नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला पद्मश्री मारुती चितमपल्ली यांचे नाव देण्यात यावे आणि पक्ष्यांच्या अधिवासाला धोका निर्माण करणाऱ्या भटक्या कुत्र्यांना आळा घालावा, असे हे ठराव आहेत. या ठरावांची तातडीने अंमलबजावणी व्हावी यासाठी ते राज्य शासनाकडे पाठवले जाणार आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक नाट्यगृहात सुरू असलेल्या या संमेलनाचा समारोप रविवार, २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी झाला. वरिष्ठ सनदी अधिकारी तथा राज्य शासनाच्या कर्जमुक्ती समितीचे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन पार पडले. या संमेलनाला राज्यभरातील पक्षीमित्रांनी हजेरी लावली होती. पहिल्या ठरावानुसार, मारुती चितमपल्ली हे वन्यजीव, पक्षी आणि वनसंपदा यावर सखोल अभ्यास असलेले 'अरण्यऋषी' म्हणून ओळखले जातात.
त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे. त्यांच्या या योगदानाला आदरांजली म्हणून विदर्भातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला त्यांचे नाव देण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर यांनी हा ठराव मांडला. दुसऱ्या ठरावात पक्ष्यांच्या अधिवासांना भटक्या कुत्र्यांमुळे वाढत असलेल्या धोक्यावर चिंता व्यक्त करण्यात आली. या भटक्या कुत्र्यांना आळा घालण्यासाठी संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी या ठरावाद्वारे करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी