
लातूर, 3 नोव्हेंबर (हिं.स.)।
लातूर जिल्हयात गेल्यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने ऊसाच्या क्षेत्रात वाढ झाली होती. तसेच मे पासून आजपर्यंत जिल्हयात सतत पाऊस पडत असल्याने ऊसाचे पिक जोमात आहे. यावर्षी साखर कारखान्यांच्या २०२५-२६ चा गळीत हंगाम सुरू होणार असून त्यासाठी ७७ हजार हेक्टर क्षेत्रावर ऊसाचे पिक उपलब्ध आहे. या ऊसाच्या उपब्धतेनुसार जिल्हयात यावर्षी ६१ लाख ६० हजार मेट्रीक टन म्हणजेच गेल्यावर्षी पेक्षा यावर्षी ऊसाचे दुप्पट गाळप होणार आहे. त्यासाठी साखर कारखान्यांनीही कंबर कसली आहे.
लातूर जिल्हयात गेल्यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने जिल्हयात बागायतीच्या क्षेत्रात ब-यापैकी वाढ झाली. ज्या शेतक-यांकडे पाण्याचे स्त्रोत उपलब्ध आहेत, अशा शेतक-यांनी ठिबक सिंचनाचा वापर करून ऊसाचे पिक जोपासले. यावर्षी मे महिण्यापासूनच जिल्हयात पावसाला सुरूवात झाली. जिल्हयात अद्याप सरासरीपेक्षा अधिक दमदार पाऊस झाला आहे. त्यामुळे ऊसाचे पिक जोमात आहे. गेल्यावर्षी पेक्षा यावर्षी ऊसाचे क्षेत्र गाळपासाठी अधिक प्रमाणात उपलब्ध आहे. कृषि विभागाच्या अहवालानुसार व साखर कारखान्यांच्याकडील नोंदी असा ७७ हजार हेक्टर क्षेत्रावरील ऊस यावर्षी गाळपासाठी उपलब्ध होणार आहे. या उपलब्ध ऊसाचे नोव्हेंबर पासून साखर कारखान्याकडून गाळप सुरू होणार आहे. जिल्हयात यावर्षी ऊसाचे विक्रमी गाळप होण्याची शक्यता आहे.
जिल्हयात गेल्यावर्षी ६ सहकारी व ५ खाजगी साखर कारखान्यांनी अशा ११ साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम पार पडला. यात विलास २ तोंडार या साखर कारखाना, विलास सहकारी साखार कारखाना, रेणा सहकारी साखर कारखाना, जागृती शुगरचा साखर कारखाना, सिध्दी शुगर लि. साखर कारखाना, संत शिरोमणी मारूती महाराज सहकारी साखर कारखाना, ट्वैटीवन शुगर साखर कारखाना, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखाना, श्री साईबाबा शुगर लि. साखर कारखाना, शिवाजीराव पाटील निलंगेकर साखर कारखाना, शेतकरी सहकारी साखर कारखाना यांनी ३३ लाख ९९ हजार ९७९ मेट्रीक टन ऊसाचे गाळप करून ३२ लाख ११ हजार ९३२ क्विंटल साखरेची निमिर्ती केली. या साखर कारखान्यांचा ९.४५ असा साखर उतारा राहिला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis