
परभणी, 3 नोव्हेंबर (हिं.स.)।
शहरातील नानलपेठ पोलिस
ठाण्याच्या हद्दीत जुन्या वसाहतीत, मुख्य बाजारपेठेत नव्याने पोलिस चौकी कार्यान्वित करण्यासाठी या पोलिस चौकींचे जागेचे परिसर स्वच्छ करून तेथे सुशोभीकरण केले जात आहे.
यामध्ये शिवाजी चौक भागातील जुनी पोलिस चौकी येथे कर्मचारी यांना कायमस्वरूपी रात्रीच्या वेळी कार्यरत राहण्यास तेथे कामे करण्यात आली तर मोमीनपुरा जुन्या नानलपेठ ठाणे परिसरात सुद्धा एक चौकी कार्यान्वित करण्यासाठी तेथे यंत्रणा उभी करण्यात येत आहे. जुना मोंढा भागातील जुनी शहर वाहतूक शाखेची चौकी येथे रंगरंगोटी करून स्वच्छता करण्यात आली. यामुळे आगामी काळात रात्रीची गस्त, विविध चौकात देखरेख ठेवण्यास उपाय योजना केल्या
जात आहेत. पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या सूचनेनुसार नानलपेठचे पोलिस निरीक्षक गणेश कदम यांनी ही कामे केली आहेत.
दरम्यान, काही संवेदनशील भाग तसेच मुख्य बाजारपेठ आणि नागरी वसाहत असल्याने या उपाययोजना नानलपेठ पोलिस ठाण्याने करण्यास सुरुवात केली आहे. हद्दीत सध्या विसावा चौकी, अष्टभूजा मंदिर, जिल्हा रुग्णालयात चौकी कार्यान्वित आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis