
अंतराळ स्थानकावर अवकाशातील कचरा आदळल्याने समस्या
बीजिंग , 5 नोव्हेंबर (हिं.स.)। चीनच्या मानवी अंतराळ मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. चीनच्या अंतराळ स्थानकाला सूक्ष्म अंतराळ कचऱ्याची टक्कर झाल्यामुळे बुधवारी ठरलेली अंतराळवीरांची परतीची प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. ही माहिती चायना मॅनड स्पेस एजन्सी (सीएमएसए) ने दिली आहे.
एजन्सीने सांगितले की हा निर्णय अंतराळवीरांच्या सुरक्षेला प्राधान्य देत आणि मिशनच्या यशासाठी खबरदारी म्हणून घेण्यात आला आहे. चीन दर सहा महिन्यांनी आपल्या अंतराळ स्थानकावरील दलाची अदलाबदल करतो. गेल्या शनिवारी शेनझोउ-20 अंतराळयानाने शेनझोउ-21 मोहिमेच्या क्रूसह कक्षेत “हँडओव्हर प्रक्रिया” पूर्ण केली होती. अंतराळ स्थानकाच्या “चाव्या” मंगळवारी औपचारिकपणे नव्या दलाकडे सुपूर्द करण्यात आल्या.
शेनझोउ-20 मोहिमेतील तीन अंतराळवीर — चेन डोंग, चेन झोंगरुई आणि वांग जिए — यांनी आपले सर्व नियोजित काम पूर्ण केले होते आणि बुधवारी इनर मंगोलियातील डोंगफेंग लँडिंग साइटवर उतरण्याचे नियोजन होते. मात्र, अंतराळ कचऱ्याच्या टक्करमुळे त्यांची परतीची प्रक्रिया तात्पुरती थांबवण्यात आली आहे.
दरम्यान, चीनने अलीकडेच शेनझोउ-21 अंतराळयानाद्वारे तीन नवीन अंतराळवीरांना सहा महिन्यांच्या मोहिमेसाठी आपल्या कक्षीय स्थानकावर पाठवले आहे. यापूर्वी चीनने जाहीर केले होते की 2030 पर्यंत आपल्या अंतराळवीरांना चंद्रावर उतरवण्याचे लक्ष्य त्यांनी निश्चित केले आहे आणि त्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम सुरू आहे.चीनच्या मानवी अंतराळ कार्यक्रमाचे प्रवक्ते झांग जिंगबो यांनी सांगितले होते की सध्या मानवयुक्त चंद्र मोहिमेशी संबंधित सर्व संशोधन आणि विकास प्रकल्प सुरळीतपणे सुरू आहेत.लॉन्ग मार्च-10 रॉकेट, चंद्र लँडिंग सूट आणि एक्सप्लोरेशन व्हेईकल यांसारख्या प्रकल्पांवर जोरदार काम सुरू आहे .त्यांनी स्पष्ट केले — “2030 पर्यंत चीनचा एक नागरिक चंद्रावर पाऊल ठेवेल, हा आमचा निर्धार दृढ आणि अढळ आहे.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode