
ढाका, 5 नोव्हेंबर (हिं.स.) बांग्लादेशमधील मोहम्मद युनूस सरकारने भारतात वॉन्टेड असलेल्या कट्टर इस्लामी प्रवचक जाकिर नाईक यांच्या प्रस्तावित बांग्लादेश दौऱ्यावर आता बंदी घातली आहे. तीव्र टीका आणि वाद निर्माण झाल्यानंतर सरकारने स्पष्ट केले आहे की सध्या नाईक यांना देशात प्रवेश करण्याची परवानगी दिली जाणार नाही. हा निर्णय मंगळवारी ढाका सचिवालयात झालेल्या गृह मंत्रालयाच्या कायदा व सुव्यवस्था कोर समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
याआधी युनूस सरकारने द्वेषपूर्ण भाषणांसाठी कुख्यात असलेल्या जाकिर नाईक यांच्या स्वागताची तयारी सुरू केली होती. ही बातमी समोर आल्यानंतर भारताने अधिकृतरीत्या आक्षेप नोंदवला. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन जारी करून सांगितले होते की, जर जाकिर नाईक ढाकाला पोहोचले, तर त्यांना भारताच्या ताब्यात दिले जावे अशी अपेक्षा आहे.अहवालांनुसार, नाईक 28-29 नोव्हेंबर रोजी ढाकामध्ये आयोजित होणाऱ्या एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी होणार होते. या कार्यक्रमाचे आयोजन स्पार्क इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीकडे होते, ज्यांनी अलीकडेच फेसबुकवर घोषणा केली होती की ते नाईक यांना बांग्लादेशात आणण्याची तयारी करत आहेत. हा कार्यक्रम ढाकाच्या अगरगाव परिसरात होणार होता आणि आयोजकांनी दावा केला होता की त्यांना सरकारची परवानगी मिळाली आहे. मात्र, आता सरकारने हा कार्यक्रम रद्द केला आहे.
दरम्यान, बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या सरकारने 2016 मध्येच जाकिर नाईक यांच्या देशप्रवेशावर बंदी घातली होती. त्याच वर्षी ढाकातील एका कॅफेवरील दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या दोन दहशतवाद्यांबाबत हे उघड झाले होते की ते नाईक यांच्या कट्टर भाषणांमुळे प्रभावित झाले होते.सध्या जाकिर नाईक मलेशियामध्ये आश्रय घेत आहेत. भारतात त्यांच्या विरोधात दहशतवाद, मनी लॉन्ड्रिंग आणि द्वेष पसरविणारी भाषणे यांसारख्या अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. 2016 साली राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (एनआयए) त्यांच्या विरोधात दहशतवादविरोधी कायद्यांखाली खटला दाखल केला होता. त्यानंतर नाईक भारतातून पळून गेले आणि मलेशियामध्ये कायमस्वरूपी रहिवासी दर्जा मिळवला.
भारतामध्ये नाईक यांच्या विरोधातील चौकशी अजूनही सुरू आहे आणि भारतीय संस्था त्यांच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करत आहेत. बांग्लादेश सरकारचा हा निर्णय प्रादेशिक सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा पाऊल मानला जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode