
अहिल्यानगर, 7 नोव्हेंबर (हिं.स.)।
जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात आज शिवसेनेचा जाहीर मेळावा उत्साहात पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी तब्बल 25 सरपंच, अनेक पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करत पारनेरच्या राजकारणात नवा अध्याय सुरू केला.
या वेळी उपस्थित असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “पारनेरच्या विकासाची जबाबदारी माझीच आहे” असे सांगत झावरे पाटील यांचे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले.
या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “सुजित झावरे पाटील यांच्या प्रवेशामुळे पारनेर तालुक्यात आणि नगर जिल्ह्यात शिवसेनेची ताकद प्रचंड वाढली आहे. त्यांनी समाजकारणातून आणि जनतेच्या विश्वासातून स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. त्यांच्याकडे धनादेश नसला तरी जनादेश आहे,” असे शिंदे यांनी गौरवोद्गार काढले.
मेळाव्यात शिंदे यांनी निवडणुकीचा संकल्प मांडला लोकसभा, विधानसभा निवडणुका आपण जिंकल्या आहेत. आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भगवा फडकवण्याचा संकल्प करूया. पारनेरपासून राज्यभर भगवा फडकवू.”
शिंदे म्हणाले, “सुजित पाटील हे प्रामाणिक, कार्यक्षम आणि लोकाभिमुख नेते आहेत. वयाच्या 23 व्या वर्षी पंचायत समितीचे सभापती, आणि 28 व्या वर्षी सर्वात तरुण जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होण्याचा मान त्यांनी मिळवला. त्यांच्या नेतृत्वाखाली पारनेरचा विकास वेगाने होईल. त्यांच्या पाठीशी माझे आणि शिवसेनेचे संपूर्ण बळ आहे.”
या मेळाव्यात बोलताना शिंदे यांनी आपल्या भाषणात विविध मुद्द्यांना स्पर्श केला. ते म्हणाले “लोकप्रतिनिधी हा जनतेचा सेवक असावा, स्थगिती देणारा नसावा. मी मुख्यमंत्री होण्यापूर्वी स्थगिती सरकार पाहिलं, पण आता स्पीड ब्रेकर काढून विकासाच्या दिशेने आपण वाटचाल करत आहोत.”
त्यांनी पुढे सांगितले की, “पारनेर तालुक्यातील मनरेगा निधी वाढवण्याचे निर्देश मी भरत गोगावले यांना देणार आहे. तसेच पारनेर पाणीपुरवठा योजनेचा डीपीआर तत्काळ मंजूर केला जाईल. नगरपालिकेच्या कचरा प्रकल्पासाठीही निधी उपलब्ध करून दिला जाईल.”
बिबट्यांच्या हल्ल्याबाबत बोलताना शिंदे म्हणाले, “सरकार या घटनांना पूर्णविराम देईल. मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून योग्य नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुढील काळात अशा घटनांचा बळी कोणीही होऊ नये, यासाठी सरकार ठोस उपाययोजना करेल.”
शिंदे यांनी भाषणात ‘लाडकी बहीण योजना’ या जनकल्याणकारी उपक्रमावरही भाष्य केले. ते म्हणाले, “या योजनेबद्दल अफवा पसरवणाऱ्यांनी लक्षात ठेवावं, ही योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही. ही माझ्या लाडक्या बहिणींसाठी आहे, आणि मी ‘डेडिकेटेड टू कॉमन मॅन’ आहे. या राज्यातील अडिज कोटी लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ हीच माझी खरी ओळख आहे.”
त्यांनी पुढे विरोधकांवर निशाणा साधत म्हटलं, “ज्यांनी विकास प्रकल्पांना स्पीड ब्रेकर टाकले, त्यांनाच जनतेने फेकून दिले. आम्ही सत्ता सोडून गेलो, पण जनतेने आम्हाला पुन्हा स्वीकारलं. महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास आमच्यावर आहे.”
कार्यकर्त्यांना उद्देशून शिंदे म्हणाले,
“शिवसेनेचा कार्यकर्ता हा आमचा टॉनिक आहे. शिवसेना ही कार्यकर्त्यांचा सन्मान करणारी पक्षसंस्था आहे. जो काम करेल तो पुढे जाईल, मागण्याची गरज नाही.”
या वेळी शिंदे यांनी सुजित झावरे पाटील यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत, त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
“तुमच्या घरात सत्ता ही नवी नाही, पण तुमच्या प्रामाणिकपणामुळे आणि जनतेच्या प्रेमामुळे तुम्ही आज योग्य घरात म्हणजे शिवसेनेत दाखल झाला आहात. आता धनुष्यबाण हातात आहे, योग्य दिशेने लक्ष्य साधा, बाकी सर्व जबाबदारी माझी,” असे आश्वासन शिंदे यांनी दिले.
शेवटी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना अतिवृष्टीतील नुकसानीबाबत तत्काळ मदत देण्याचे आदेश देत, “जनतेच्या समस्या म्हणजे माझ्या समस्या आहेत. ऑन द स्पॉट डिसिजन घेणं हीच माझी शैली आहे,” असे सांगून भाषणाची सांगता केली.
यावेळी आमदार शरद सोनावणे, आमदार विठ्ठल लंघे पाटील, आमदार अमोल खताळ, शिवसेना प्रवक्ते संजीव भोर पाटील आणि पारनेर तालुक्यातील हजारो शिवसैनिक, ग्रामपंचायत प्रतिनिधी, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर