अकोला येथे शरद पवारांचा शेतकऱ्यांशी संवाद!
अकोला, 8 नोव्हेंबर (हिं.स.)। मी मागील तीन वर्षापासून कृषी क्षेत्रातील एआय तंत्रज्ञानाचा अभ्यास करीत आहे. एआय तंत्रज्ञानातून कृषी समस्यावर तोडगा काढू शकतो. एआय तंत्रज्ञानातून केळीचे अफलातून (अद्भूत) उत्पादन घेता येते. ऊसामध्ये हे तंत्रज्ञान वापरले.
प


अकोला, 8 नोव्हेंबर (हिं.स.)। मी मागील तीन वर्षापासून कृषी क्षेत्रातील एआय तंत्रज्ञानाचा अभ्यास करीत आहे. एआय तंत्रज्ञानातून कृषी समस्यावर तोडगा काढू शकतो. एआय तंत्रज्ञानातून केळीचे अफलातून (अद्भूत) उत्पादन घेता येते. ऊसामध्ये हे तंत्रज्ञान वापरले. पिकांमध्ये मोठी सुधारणा झाली. सुदैवाने चार कृषी विद्यापीठे महाराष्ट्रात आहेत. कापूस, सोयाबीनसाठी एआय तंत्रज्ञान वापरावे. त्यासाठी शासनाने पुढाकार घेवून कष्टकरी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन व अर्थसहाय्य देण्याची गरज असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार म्हणाले.

देशाचे माजी कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत शनिवारी अकोल्यातील पोहरे फार्म, कान्हेरी येथे ‘शेतकरी संवाद’ हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी ते बोलत होते.सेंद्रिय शेतीतून मिळणारे उत्पादन महत्वाचे आहे. उत्पादन खर्च व बाजारातून मिळणारे उत्पादन याचा ताळमेळ साधता येण्याची गरजही शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केली.

आरक्षणाचा आग्रह करणाऱ्या मराठा व ओबीसींमध्ये कटूता निर्माण झाली आहे. कष्टकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले. आरक्षण आवश्यक आहेच, मात्र कटूता व दुरावा नको. त्या दृष्टीने प्रयत्न आवश्यक आहेत. कृषी क्षेत्राची परिस्थिती आज बदलली आहे. लोकसंख्या जास्त होत असताना शेती कमी होत आहे. विकास कामांसाठी शेतीची जमीन घेतली जाते. दिवसेंदिवस जमीन कमी-कमी होत आहे. त्यातून शेतीवर बोजा वाढला. तो बोजा कमी करण्याची गरज आहे. घरातील दोनपैकी एका मुलाने शेती केली पाहिजे. उत्पादन व खर्चाचा विचार होणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळाला पाहिजे, हीच शासनाची भूमिका असावी, असेही शरद पवार म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज सर्वांच्या अंतःकरणात आहेत. शिवाजी महाराजांचे रयतेचे राज्य होते. त्यांच्या सैन्य दलात सर्व जातीचे सैनिक होते. मुस्लिमही मोठ्या संख्येने होते. आज राज्यातील काही जिल्ह्यात वेगळे वातावरण आहे. विशेषतः मराठवाड्यातील वातावरण बिघडत आहे. मराठा आणि ओबीसींमध्ये अंतर निर्माण झाले. समाजातील एकतेची वीण उसविली. आरक्षण आवश्यक आहेच, मात्र समाजात कटूता व दुरावा नको, अशी आशा शरद पवार यांनी याप्रसंगी व्यक्त केली.

कार्यक्रमादरम्यान शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून घेतल्या आणि त्या सोडविण्यासाठी शासन, सहकारी संस्था आणि समाजाने एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले. हवामान बदल, वाढते उत्पादन खर्च, बाजारभावातील चढउतार आणि सिंचन व्यवस्थेतील अडचणी यावर त्यांनी सविस्तर चर्चा केली. कार्यक्रमाला माजी मंत्री अनिल देशमुख, अकोला-वाशीम जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. संतोषकुमार कोरपे, माजी मंत्री व शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, माजी राज्यमंत्री अझहर हुसेन, माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष शिरीष धोत्रे यांसह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

किसान ब्रिगेडचे अध्यक्ष प्रकाश पोहरे यांनी या प्रसंगी प्रभावी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन सादर करून शेतकऱ्यांची कशी लूट केली जात आहे याचे विस्तृत विवेचन केले. त्यांनी शासनाने शेतकऱ्यांची तात्काळ कर्जमुक्ती करावी, अशी आग्रही मागणी यावेळी केली. ज्येष्ठ नेते महादेवराव भुईभार, भाई प्रदीप देशमुख आणि इतर मान्यवरांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर विचार मांडले. कृषी, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक आणि उद्योग क्षेत्रातील विविध मान्यवरांनीही कार्यक्रमात सहभाग घेतला. आयोजकांच्या आवाहनानुसार कार्यक्रम साधेपणाने पार पडला.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande