
नाशिक, 8 नोव्हेंबर (हिं.स.)। – सार्वजनिक वाचनालय, नाशिक येथे ‘वंदे मातरम्’ राष्ट्रगीताच्या १५० वर्षपूर्ती निमित्त सामुदायिक वंदे मातरम् कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या सारडा कन्या विद्यालयातील विद्यार्थिनींनी संगीत शिक्षक ओंकार वैरागकर यांच्या मार्गदर्शनाखाली वंदे मातरम् गीताचे उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या स्वच्छ, सुरेल आणि एकसंध गायनाने सभागृहात देशभक्तीचा स्वर गुंजला.
कार्यक्रमास वाचनालयाचे उपाध्यक्ष वैद्य विक्रांत जाधव, कार्याध्यक्ष संजय करंजकर, प्रमुख सचिव सुरेश गायधनी, सहाय्यक सचिव प्रा. सोमनाथ मुठाळ, ग्रंथसचिव देवदत्त जोशी, बालभवन प्रमुख सौ. प्रेरणा बेळे, सदस्य मंगेश मालपाठक, किशोर घाटे, दीपा ब्रम्हेचा सारडा शाळेतील शिक्षक मनीषा सावळे, रामदास चव्हाण, अतुल भालेराव, दायावंती मते, वैशाली बोरसे, संजय मेहेरखांब तसेच मान्यवर सभासद आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संपूर्ण वंदेमातरम गीताचे लेखक बंकिमचंद्र चटोपाध्याय आणि क्रांतिकारक व देशभक्त यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी वंदे मातरम् गीताचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व स्पष्ट करणारे मनोगत आणि उपस्थितांचे स्वागत सुरेश गायधनी यांनी केले. उपस्थितांनी उभे राहून सामूहिकरित्या गीतगायन करून मातृभूमीप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यवस्थापक दिलीप अहिरे यांनी केले व आभारप्रदर्शन बालभवन प्रमुख सौ.प्रेरणा बेळे यानी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगिनी जोशी, राधा राउत, दिलीप बोरसे, अनिता नगरकर, पौर्णिमा कर्डक, कीर्ती नागरे, जितेंद्र मालवीय यांनी परिश्रम घेतले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV