
मुंबई, 8 नोव्हेंबर (हिं.स.)। मिनी ब्रँडनं भारतीय बाजारात आपली सर्वात शक्तिशाली इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘कंट्रीमॅन एसई ऑल4’ लाँच केली आहे. 66.90 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू असलेल्या या प्रीमियम इलेक्ट्रिक एसयूव्हीची जेसीडब्ल्यू (जॉन कूपर वर्क्स) थीम व्हेरिएंटसाठी बुकिंग सुरू झाली असून, सीबीयू (कम्प्लीटली बिल्ट-अप) आयातित असलेली ही कार तात्काळ डिलिव्हरीसह उपलब्ध होणार आहे. यापूर्वी लॉंच झालेल्या जेसीडब्ल्यू कंट्रीमॅन ऑल4 नंतर मिनीची ही नवी इलेक्ट्रिक आवृत्ती भारतीय बाजारात मोठा प्रभाव निर्माण करण्यास सज्ज आहे.
313 हॉर्सपॉवर आणि 494 न्यूटन-मीटर टॉर्कसह ही कार पेट्रोल जेसीडब्ल्यूपेक्षा अधिक शक्तिशाली ठरली असून, भारतातील सर्वात दमदार मिनी कारचा मान तिला मिळाला आहे. केवळ एक इलेक्ट्रिक एसयूव्ही न राहता, शहरी तसेच ऑफ-रोड ड्रायव्हिंगसाठी डिझाइन केलेली ही कार स्टायलिश, टेक्नॉलॉजी आणि सस्टेनेबल आहे.
कंट्रीमॅन एसई ऑल4 च्या बाह्य रचनेत अपडेटेड ग्रिल, रिफ्रेश्ड हेडलॅम्प्स आणि अधिक स्कल्प्टेड बोनेट आहे. फ्लश डोर हँडल्समुळे कारचे एअरोडायनॅमिक प्रोफाइल अधिक आकर्षक दिसते, तर जेट ब्लॅक रूफनं कॉन्ट्रास्टिंग टच दिला आहे. जेसीडब्ल्यू ट्रिममध्ये ब्लॅक स्ट्राइप्स, रूफ रेल्स, 19-इंच अलॉय व्हील्स आणि क्लॅडिंगमुळे कारला स्पोर्टी लुक मिळतो. लेजेंड ग्रे आणि मिडनाइट ब्लॅक या दोन रंगांमध्ये ती उपलब्ध आहे. एलईडी डीआरएल्स, हेडलॅम्प्स आणि टेललॅम्प्समध्ये कस्टमायझेबल लाइटिंग मोड्स असून, रात्री कारचे आकर्षण अधिक वाढते.
आतल्या भागात जेसीडब्ल्यू-स्पेसिफिक स्टेअरिंग व्हील, सीट्स आणि ट्रिम्समुळे स्पोर्टी फील येतो. पॉवर्ड ड्रायव्हर सीट, रिसायकल्ड 2डी निटेड फॅब्रिक लाइनिंग, पॅनोरॅमिक ग्लास रूफ आणि अॅम्बियंट लाइटिंगमुळे इन्टेरियर अधिक आलिशान वाटतो. मिनीचा सिग्नेचर राऊंड ओएलईडी डिस्प्ले, हेड-अप डिस्प्ले, वायरलेस फोन मिररिंग, क्रूज कंट्रोल आणि 360-डिग्री कॅमेरा यांसारखे फीचर्स आधुनिक अनुभव देतात. सुरक्षेसाठी मल्टिपल एअरबॅग्स, टायर-प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि हार्मन कार्डन साउंड सिस्टम देण्यात आली आहे.
कंट्रीमॅन एसई ऑल4 मध्ये ड्युअल-मोटर सेटअप असून, ती 0 ते 100 किमी/तास वेग फक्त 5.6 सेकंदात गाठते, तर टॉप स्पीड 180 किमी/तास आहे. 66.45 किलोवॅट-आवर बॅटरी 440 किलोमीटरपर्यंतची WLTP रेंज देते. डीसी फास्ट चार्जिंगद्वारे 10% ते 80% चार्ज केवळ 29 मिनिटांत होतो, तर एसी चार्जिंगनं पूर्ण चार्जसाठी 3 तास 45 मिनिटे लागतात.
भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा वाढता बाजार लक्षात घेता, मिनी कंट्रीमॅन एसई ऑल4 ही कार प्रीमियम असूनही पर्यावरणपूरक, कार्यक्षम आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून फायदेशीर ठरणार आहे. जेसीडब्ल्यू व्हेरिएंटची बुकिंग सुरू असल्याने या शक्तिशाली आणि स्टायलिश इलेक्ट्रिक एसयूव्हीची तात्काळ डिलिव्हरी लवकरच ग्राहकांना मिळणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule