
मुंबई, 9 नोव्हेंबर (हिं.स.)। रिलायन्स जिओनं आपल्या सर्व वापरकर्त्यांसाठी गूगल AI प्रोचे तब्बल १८ महिन्यांचे मोफत सबस्क्रिप्शन देण्याची घोषणा केली आहे. ही ऑफर जिओ आणि गूगल यांच्यातील भागीदारीचा नवा टप्पा ठरत असून, सुरुवातीला १८ ते २५ वयोगटासाठी मर्यादित असलेला हा लाभ आता सर्व जिओ ग्राहकांसाठी खुला करण्यात आला आहे. या माध्यमातून वापरकर्त्यांना गूगलच्या जेमिनी 2.5 प्रो एआय मॉडेलचा प्रवेश मिळणार असून, व्हिडिओ जनरेशन, कोडिंग, संशोधन आणि गूगल वर्कस्पेस एकीकरणासारखी सर्व प्रगत वैशिष्ट्ये पूर्णपणे मोफत वापरता येतील.
या सबस्क्रिप्शनमध्ये “Veo 3.1 फास्ट” हे विशेष फीचर उपलब्ध असून, त्याद्वारे वापरकर्ते फक्त टेक्स्ट प्रॉम्प्ट्सच्या आधारे एआय-पॉवरड व्हिडिओ तयार करू शकतील. या व्हिडिओंमध्ये ध्वनी आणि संवाद आपोआप जोडले जातात, ज्यामुळे वैयक्तिक तसेच व्यावसायिक सामग्री निर्मिती अधिक सुलभ होते. याशिवाय, जिओ ग्राहकांना जेमिनी कोड असिस्ट IDE एक्स्टेंशन्स, कमांड लाइन इंटरफेस (CLI) आणि वाढलेली वापर मर्यादा मिळणार आहे, ज्याचा लाभ विशेषतः डेव्हलपर्स आणि कोडर्सना होईल.
प्रो वापरकर्त्यांना गूगल ड्राइव्ह, जीमेल, डॉक्स, शीट्स, चॅट्स आणि अॅडमिनसारख्या वर्कस्पेस अॅप्समध्ये थेट एआय सहाय्य मिळेल. तसेच, या मोफत सबस्क्रिप्शनसोबत २ टेराबाइट क्लाउड स्टोरेजची सुविधा आणि व्हिस्क, फ्लो, नोटबुकएलएम यांसारख्या एआय-पॉवरड अॅप्सच्या वाढीव वापर मर्यादाही देण्यात आली आहे.
या ऑफरचा लाभ घेण्यासाठी वापरकर्त्यांकडे सक्रिय जिओ सिम आणि अनलिमिटेड ५जी प्लॅन असणे आवश्यक आहे. त्यानंतर मायजिओ अॅपमध्ये जाऊन ‘अर्ली अॅक्सेस’ बॅनरमधून “क्लेम नाऊ” पर्याय निवडून प्रक्रिया पूर्ण करता येते. नंतर जेमिनी अॅप उघडून प्रो सबस्क्रिप्शन सक्रिय झालं की नाही हे पडताळता येईल.
जिओ आणि गूगलची ही भागीदारी भारतातील डिजिटल क्रांतीला नवी गती देणारी ठरत असून, लाखो जिओ वापरकर्त्यांना प्रगत एआय तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी देणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule