
रत्नागिरी, 8 नोव्हेंबर, (हिं. स.) : ऑडेक्स इंडिया रँडोनिअर्स संलग्न चिपळूण येथील सह्याद्री रँडोनिअर्सतर्फे आयोजित पाच दिवसीय सुपर रँडोनिअर सिरीजमध्ये सहभागी होत सावर्डे (ता. चिपळूण) येथील पृथ्वी कृष्णकांत पाटील याने अवघ्या पाच दिवसांत सुपर रँडोनिअर होण्याचा पराक्रम केला. हा किताब मिळविणारा पृथ्वी पाटील संपूर्ण कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पहिला सायकलपटू ठरला आहे.
ऑडेक्स इंडिया रँडोनिअर्सच्या अंतर्गत भारतातील विविध क्लब बीआरएम (Brevets de Randonneurs Mondiaux) या सायकल क्रीडाप्रकाराचे आयोजन करतात. या अंतर्गत २००, ३००, ४०० आणि ६०० किमी अंतर सायकल चालविण्यासाठी अनुक्रमे १३.५, २०, २७ आणि ४० तासांची मर्यादित मुदत दिली जाते. या सर्व राइड्स पूर्णपणे सेल्फ सपोर्टेड असतात.
सामान्यतः जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत चारही बीआरएम पूर्ण केल्यानंतर रायडरला सुपर रँडोनिअर किताब दिला जातो. मात्र या प्रकारातील आव्हानात्मकता वाढविण्यासाठी सह्याद्री रँडोनिअर्सने सलग पाच दिवसांतच सर्व बीआरएम आयोजित केल्या होत्या. अशा कठीण परिस्थितीत शारीरिक ताकदीपेक्षा मानसिक स्थैर्याचा कस लागतो. केवळ पाच दिवसांत १५०० किमी सायकल चालवत पृथ्वीने हा पराक्रम साधला आहे. या यशानंतर समाजाच्या सर्व थरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.पृथ्वी हा सावर्डे येथील प्रथितयश डॉ. कृष्णकांत पाटील व डॉ. सौ. दर्शना पाटील यांचा सुपुत्र असून तो चिपळूण सायकलिंग क्लबचा सक्रिय सदस्य आहे. चिपळूण येथे आगमन झाल्यानंतर चिपळूण सायकलिंग क्लबच्या सदस्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी