
ढाका, 9 नोव्हेंबर (हिं.स.)।शेख हसीना यांच्या प्रभावामुळे बांग्लादेशातील युनूस सरकार इतकी भयभीत झाली आहे की, संपूर्ण ढाका शहराला छावणीचे रूप देण्यात आले आहे.राजधानी ढाकामध्ये शनिवारी (८ नोव्हेंबर) पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर समन्वित सुरक्षा सराव केला. माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या बरखास्त झालेल्या अवामी लीग पक्षाने १३ नोव्हेंबर रोजी प्रस्तावित केलेल्या ‘ढाका लॉकडाऊन’ कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर हा सराव करण्यात आला.अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेरही मोठ्या प्रमाणावर पोलिस तैनात करण्यात आले आहेत. पोलिसांचा दावा आहे की हे नियमित सुरक्षा तयारीचा भाग आहे, मात्र या अचानक वाढलेल्या हालचालीमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
ढाका महानगर पोलिसांच्या माहितीनुसार, शनिवारी सुमारे ७,००० पोलिस कर्मचाऱ्यांनी शहरभर झालेल्या या समन्वित सरावात भाग घेतला. ही ड्रिल एकाच वेळी ढाक्यातील १४२ प्रमुख ठिकाणी पार पडली — ज्यात संसद भवन, पंतप्रधानांचे निवासस्थान, सरकारी मंत्रालये, दूतावास परिसर आणि विमानतळ मार्ग यांचा समावेश होता.
अधिकाऱ्यांच्या मते, या सरावाचा उद्देश पोलिस दलाची तत्परता आणि समन्वय क्षमता तपासणे हा होता, जेणेकरून संभाव्य हिंसक आंदोलन किंवा आपत्कालीन परिस्थितीला तोंड देता येईल. सुरक्षा सरावादरम्यान अंतरिम सरकार प्रमुख मोहम्मद युनूस यांच्या निवासस्थानाच्या परिसरालाही विशेष सुरक्षा कवच देण्यात आले. पोलिस सूत्रांच्या म्हणण्यानुसार, आंदोलनकर्ते सरकारी इमारती किंवा प्रमुख व्यक्तींच्या घराबाहेर निदर्शने करू शकतात, या भीतीमुळे ही पावले उचलण्यात आली आहेत.
प्रत्यक्षदर्शींच्या मते, शनिवार संध्याकाळी ढाक्यातील प्रमुख चौकांवर पोलिस मोठ्या संख्येने दिसत होते. त्यांनी दंगारोधी उपकरणे — स्टील हेल्मेट आणि बॉडी आर्मर — परिधान केली होती. ते पादचाऱ्यांच्या पिशव्या तपासत होते आणि संशयास्पद वाहनांची तपासणी करत होते.
ढाका पोलिसांचे प्रवक्ते मुहम्मद तालेबुर रहमान यांनी पत्रकारांना सांगितले की “आमच्या नियमित कार्यप्रणालीत तात्काळ प्रतिसाद सरावांचा समावेश आहे, जेणेकरून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी आम्ही तयार राहू शकू.” एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की शनिवारीचा हा मेगा ड्रिल केवळ पोलिसांच्या समन्वय आणि तत्परतेची चाचणी नव्हता, तर १३ नोव्हेंबरपूर्वी राजधानीत संभाव्य हिंसा किंवा अस्थिरता रोखण्यासाठी एक प्रतिबंधक उपाय म्हणूनही करण्यात आला होता.
हा सराव अशा वेळी झाला आहे, जेव्हा तीन दिवसांपूर्वीच सैन्याने मागील १५ महिन्यांपासून पोलिसी कर्तव्यावर तैनात असलेल्या सुमारे ६०,००० सैनिकांपैकी निम्म्यांना परत बोलावले होते. बांग्लादेशच्या सैन्याने सांगितले की सैनिकांना विश्रांती आणि प्रशिक्षणाची गरज आहे, परंतु फेब्रुवारीत होणाऱ्या निवडणुकांसाठी अतिरिक्त दलांची तैनाती करून संपूर्ण सहकार्य दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode