
कुआलालंपुर, 9 नोव्हेंबर (हिं.स.)। म्यानमारहून सुमारे 300 स्थलांतरितांना घेऊन जाणारी एक जहाज थायलंड आणि मलेशियाच्या सीमेच्या जवळ हिंद महासागरात उलटली, ज्यामुळे प्रचंड हाहाकार माजला. या घटनेत फक्त 10 जणांना वाचवण्यात यश आले, तर समुद्रात एका व्यक्तीचा मृतदेह तरंगताना सापडला आहे. उर्वरित सर्वजण अद्याप बेपत्ता आहेत.बचाव मोहिम राबवणाऱ्या पथकाला या जहाजाच्या दुर्घटनेची माहिती वेळीच मिळाली नाही, त्यामुळे शेकडो लोक बेपत्ता झाले आहेत.
अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले की, जहाज कधी आणि नेमक्या कोणत्या ठिकाणी बुडाली हे अद्याप निश्चितपणे समजलेले नाही, म्हणूनच बहुतेक लोक बेपत्ता झाले आहेत. एका मलेशियन अधिकाऱ्याने सांगितले की, जहाज बहुधा थायलंडच्या जलक्षेत्रात उलटले असावे. त्यांनी इशारा दिला की, धोकादायक समुद्री मार्गांचा वापर करून स्थलांतरितांचे शोषण करणारे सीमापार गुन्हेगारी टोळके जलदगतीने सक्रिय होत आहेत.
एका पोलीस अधिकाऱ्याने माहिती दिली की, वाचवण्यात आलेल्या काही लोकांमध्ये रोहिंग्या मुस्लीमही आहेत, जे मुख्यतः म्यानमारमध्ये राहतात, आणि ज्यांना दशकानुदशके छळाला सामोरे जावे लागत आहे.मलेशियन मॅरिटाइम एन्फोर्समेंट एजन्सीचे फर्स्ट अॅडमिरल रोमली मुस्तफा यांनी सांगितले की, प्राथमिक चौकशीत असे दिसते की नौका म्यानमारच्या रखाइन राज्यातील बुथीदांग शहरातून निघाली होती आणि ती तीन दिवसांपूर्वी बुडाली.
एजन्सीने शनिवारी मलेशियाच्या उत्तरेकडील रिसॉर्ट बेट लंगकावीच्या जवळ काही जिवंत बचावलेले लोक सापडल्यावर शोध आणि बचाव मोहीम सुरू केली. मुस्तफा यांनी सांगितले की, म्यानमारच्या एका महिलेचा मृतदेह समुद्रात तरंगताना आढळला. त्यांनी पुढे सांगितले की, किमान 10 लोकांना घटनास्थळावरून वाचवण्यात आले, ज्यामध्ये एक बांगलादेशी आणि अनेक म्यानमारचे नागरिक होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode