
टोकियो, 9 नोव्हेंबर (हिं.स.)। जपानमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. रविवारी संध्याकाळी पाच वाजून तीन मिनिटांनी 6.7 तीव्रतेचा भूकंप झाला. त्यानंतर इवाते प्रांतात सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इवाते प्रांतातील ओफुनाटो शहरातील किनारी भागातील 2,825 घरे रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत आणि तेथील 6,138 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
जपान हवामानशास्त्र एजन्सीच्या माहितीनुसार, संध्याकाळी 5:39 वाजता इवातेच्या ओफुनाटो बंदरावर 10 सेंटीमीटर उंचीची सुनामी लाट आढळली. संध्याकाळी 5:12 वाजता इवातेच्या किनाऱ्यापासून 70 किलोमीटर अंतरावर एक हलकी सुनामी देखील नोंदली गेली. चेतावणीमध्ये 1 मीटरपर्यंतच्या लाटा येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मोरियोका शहर, इवाते प्रांतातील याहाबा गाव तसेच शेजारच्या मियागी प्रांतातील वाकुया गावात या भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर 4 मोजली गेली आहे.आत्तापर्यंत कोणत्याही मोठ्या नुकसानाची किंवा जीवितहानीची माहिती मिळालेली नाही, मात्र प्रशासन समुद्राच्या पातळीवर आणि भूकंपानंतर येणाऱ्या धक्क्यांवर (आफ्टरशॉक्सवर) बारकाईने नजर ठेवून आहे.
ईस्ट जपान रेल्वेने जाहीर केलेल्या निवेदनानुसार, तोहोकू शिंकान्सेन या बुलेट ट्रेनच्या मार्गावर काही काळासाठी वीजपुरवठा खंडित झाला असून, सेंडाइ आणि शिन-आओमोरी स्थानकांदरम्यानचे रेल्वेसेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. यापूर्वी 5 ऑक्टोबर रोजी जपानमध्ये 6.0 तीव्रतेचा भूकंप झाला होता, ज्याचे केंद्र पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली सुमारे 50 किलोमीटर खोल होते.
हा परिसर अजूनही 2011 मधील भीषण समुद्री आपत्तीच्या आठवणींमधून पूर्णपणे सावरलेला नाही. त्या वेळी 9.0 तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपामुळे प्रचंड सुनामी निर्माण झाली होती. त्या विनाशकारी नैसर्गिक आपत्तीत सुमारे 18,500 लोक मृत किंवा बेपत्ता झाले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode