
मनिला, 9 नोव्हेंबर (हिं.स.)।फिलिपिन्स सध्या निसर्गाच्या दुहेरी प्रकोपाशी झुंज देत आहे. अलीकडे आलेल्या टायफून कल्मेगीमध्ये २०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्यानंतर आता देशावर सुपर टायफून “फंग-वोंग”चे संकट घोंगावत आहे. हे वादळ यावर्षीचा सर्वात शक्तिशाली वादळ मानलं जात असून, रविवारी देशाच्या ईशान्य किनाऱ्याला धडकू लागलं आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, फंग-वोंग वादळाचा वेग ताशी १८५ किलोमीटरपर्यंत असून, वाऱ्याचे झोत ताशी २३० किलोमीटरपर्यंत पोहोचत आहेत. याचा प्रभाव सुमारे १,६०० किलोमीटरच्या परिसरात पसरू शकतो — म्हणजेच दक्षिण-पूर्व आशियाच्या जवळपास दोन-तृतीयांश भागावर याचा परिणाम होऊ शकतो. यादरम्यान, सरकारने देशभरात आपत्कालीन स्थिती घोषित केली आहे.
राष्ट्राध्यक्ष फर्डिनँड मार्कोस ज्युनियर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की त्यांनी तत्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. संरक्षण मंत्री गिल्बर्टो टियोडोरो ज्युनियर यांनी इशारा दिला आहे की हे वादळ देशातील अनेक भागांमध्ये विध्वंस माजवू शकते — ज्यामध्ये सेबू, ऑरोरा, इसाबेला आणि अगदी राजधानी मनिलाही समाविष्ट आहे.त्यांनी म्हटले, “जेव्हा पाऊस सुरू होईल किंवा वादळ पूर्ण ताकदीने येईल, तेव्हा लोकांना वाचवणे अत्यंत कठीण होईल. त्यामुळे आताच बाहेर पडणे हेच सर्वात सुरक्षित पर्याय आहे.”
आत्तापर्यंत सुमारे ५०,००० कुटुंबांना बिकोल प्रदेशातून हलविण्यात आले आहे, जिथे समुद्रकिनारी आणि मायोन ज्वालामुखीच्या आसपास भू-स्खलन आणि चिखल प्रवाह होण्याचा धोका आहे.दरम्यान, अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झाला आहे, शाळा आणि सरकारी कार्यालये बंद करण्यात आली आहेत आणि उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. सुमारे ६,६०० प्रवासी आणि कर्मचारी बंदरांवर अडकलेले आहेत कारण कोस्ट गार्डने समुद्रात कोणत्याही जहाजाला जाण्यास बंदी घातली आहे.
फिलिपिन्समध्ये दरवर्षी सुमारे २० चक्रीवादळे येतात, तसेच येथे वारंवार भूकंप आणि ज्वालामुखी उद्रेक होत असतात. त्यामुळे हा देश जगातील सर्वाधिक आपत्ती-प्रवण देशांपैकी एक मानला जातो.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode