
रायगड, 10 डिसेंबर (हिं.स.)। ख्रिस्ती धर्मियांचा नाताळ सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे पनवेल शहरातील सकाळ पासून बाजारपेठांमध्ये सणासुदीचा उत्साह दिसून येत आहे. सर्व जाती-धर्मातील नागरिक मोठ्या आनंदात हा सण साजरा करतात. विशेषतः लहान मुलांमध्ये या सणाचे विशेष आकर्षण पाहायला मिळत आहे.
सध्या पनवेलमधील प्रमुख बाजारपेठा नाताळसाठी सजावटीच्या साहित्याने सजल्या आहेत. दुकानांच्या दर्शनी भागात रंगीबेरंगी विद्युत माळा, ख्रिसमस ट्री, जिंगल बेल्स, स्टार्स, टिनसेल, बॉल्स, स्टॉकिंग्ज आणि सांताक्लॉजच्या टोपी यांची रेलचेल दिसत आहे. यासोबतच चर्च परिसर आणि गृहनिर्माण सोसायट्यांमध्येही सजावटीची तयारी सुरू झाली आहेनाताळ जवळ आल्याने नागरिकांची खरेदीसाठी गर्दी वाढताना दिसत आहे. बाजारात विविध आकारांचे कृत्रिम तसेच वास्तवदर्शी ख्रिसमस ट्री दाखल झाले असून, त्यांना मोठी मागणी आहे. मिठाई दुकाने आणि बेकरींमध्ये प्लम केक, चॉकलेट केक आणि ड्रायफ्रूट केकची विशेष तयारी सुरू आहे. अनेक बेकरी चालकांनी ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेऊन आधीपासूनच प्री-ऑर्डर स्वीकारण्यास सुरुवात केली आहे.लहान मुलांसाठी खास सांताक्लॉजचे पोशाख, टोपी, हातमोजे, मुखवटे आणि गिफ्ट पॅक बाजारात उपलब्ध झाले आहेत. सांताक्लॉजच्या वेशभूषेतील बाहुल्या आणि सजावटीच्या वस्तूंना विशेष मागणी असल्याचे दुकानदारांनी सांगितले.
काही ठिकाणी सजावटीच्या वस्तूंच्या किमती वाढल्या असल्या, तरीही नागरिकांचा उत्साह कायम आहे. दुकानदारांमध्येही समाधानाचे वातावरण असून, गेल्या काही दिवसांपासून विक्रीत वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. एकंदरित नाताळच्या आगमनामुळे पनवेल शहरातील बाजारपेठांमध्ये उत्सवाचे आणि मागणीचे वातावरण निर्माण झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके