
रायगड, 11 डिसेंबर (हिं.स.)। रायगडमध्ये एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले असून पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या लेखा शाखेत तब्बल एक कोटी अठ्ठ्याहत्तर लाखांचा (₹1,78,29,300) महसुली अपहार करण्यात आल्याचे समोर आले आहे. पोलीस पाटलांच्या मानधनासाठी बनावट नावे घालून देयक तयार करण्याचा घोटाळा केल्याप्रकरणी लेखा विभागातील कनिष्ठ लिपिकासह एकूण चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रायगड जिल्हा परिषदेतील मोठ्या आर्थिक घोटाळ्यानंतर आता थेट पोलीस विभागातच असा गंभीर भ्रष्टाचार उघड झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. आरोपी राजेश राम जाधव हे 2021 पासून पोलीस अधीक्षक कार्यालयातील लेखा शाखेत कार्यरत होते. त्यांनी जिल्ह्यातील पोलीस पाटील यांची अधिकृत यादी तयार करून, प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेल्या किंवा हजर नसलेल्या पाटलांची बनावट नावे त्यात समाविष्ट केली.
यानंतर या खोट्या यादीच्या आधारे दरमहा मानधनाचे देयक कोषागारातून मंजूर करून घेतले. पुढे त्याच यादीत फेरफार करत स्वतःच्या नावाने तब्बल ₹72,32,500 रुपये आणि पोलीस पाटील नसताना बनावट कागदपत्रे तयार करून रिया राजेश जाधव यांच्या नावाने ₹1,05,96,800 रुपये असे दोन्ही मिळून पावणे दोन कोटी रुपयांची रक्कम त्यांच्या आणि इतर सहआरोपींच्या खात्यात जमा करण्यात आली.
या तपासात आणखी धक्कादायक बाब समोर आली आहे. काही पोलीस पाटलांच्या नावाने मानधन दोन वेळा नव्हे तर अनेक वेळा त्यांच्या खात्यावर टाकण्यात आले.
सरकारी निधीचा स्वतःच्या फायद्यासाठी दुरुपयोग केल्याचे स्पष्ट पुरावे मिळाल्यानंतर राजेश जाधव, रिया जाधव आणि इतर दोन अशासकीय व्यक्ती अशा चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणामुळे पोलीस विभागाच्या प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून घोटाळ्याच्या संपूर्ण साखळीचा तपास आता गतीने सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके