गुगल जाहिरातींच्या आड सायबर फसवणूक; पनवेल पोलिसांची कारवाई
रायगड, 13 डिसेंबर (हिं.स.)। पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या सायबर पथकाने सायबर गुन्ह्यात तब्बल ५ लाख १४ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला अटक करून मोठे यश मिळवले आहे. गुगलच्या माध्यमातून बनावट जाहिरात टाकून टाटा स्टील खरेदीच्या नावाखाली फसवणूक क
गुगल जाहिरातींच्या आड सायबर फसवणूक;


रायगड, 13 डिसेंबर (हिं.स.)। पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या सायबर पथकाने सायबर गुन्ह्यात तब्बल ५ लाख १४ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला अटक करून मोठे यश मिळवले आहे. गुगलच्या माध्यमातून बनावट जाहिरात टाकून टाटा स्टील खरेदीच्या नावाखाली फसवणूक केल्याचा हा प्रकार असून, आरोपीचा माग काढत पनवेल पोलिसांनी उत्तर प्रदेश ते उत्तराखंड असा सुमारे ५०० किलोमीटरचा प्रवास करत त्याला जेरबंद केले.

या प्रकरणातील फिर्यादी संतोष अस्वले यांनी टाटा स्टील खरेदीसाठी गुगलवर संपर्क क्रमांक शोधला. संबंधित क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर आरोपीने स्वतःला टाटा स्टील कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे भासवून खोटे इन्व्हॉईस पाठवले. या बनावट कागदपत्रांच्या आधारे आरोपीने फिर्यादीकडून एकूण ५,१४,५०० रुपये उकळले.

तांत्रिक तपासादरम्यान ‘टाटा स्टील मॅन्युफॅक्चरिंग प्लांट’ या नावाने गुगल अ‍ॅड्समध्ये अपलोड केलेला मोबाईल क्रमांक आरोपी सूर्यांश सहज सिंह (वय २२ वर्षे, रा. सुलतानपूर, उत्तर प्रदेश) याचा असल्याचे निष्पन्न झाले. त्याचे लोकेशन सुलतानपूर येथे आढळल्याने, वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभय कदम व सायबर पथक उत्तर प्रदेशात रवाना झाले.

दरम्यान आरोपी सुलतानपूरहून नैनीताल, उत्तराखंडकडे जात असल्याचे समजताच पथकाने तातडीने रात्रीचा प्रवास करत सुलतानपूर ते नैनीताल असा सुमारे ५०० किमीचा प्रवास केला. भीमताल पोलीस ठाण्याच्या हद्दीत, स्थानिक पोलीस अमलदार जितू ठाकूर यांच्या मदतीने आरोपीला ताब्यात घेण्यात आले.

आरोपीकडून मोबाईल व लॅपटॉप जप्त करण्यात आले असून, त्यामध्ये गुगल अ‍ॅड्स, बनावट वेबसाईट, तसेच मुख्य आरोपींसोबतचे चॅट्स आढळून आले आहेत. पुरेसे तांत्रिक पुरावे हाती लागल्याने आरोपीला अटक करून मा. न्यायालय, नैनीताल येथे हजर करत ट्रान्झिट रिमांड घेण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अभय कदम करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande