
सोलापूर, 13 डिसेंबर (हिं.स.)।
सोलापूरमधील डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात आरोपी असलेल्या मनिषा मुसळे यांच्या वकिलांनी न्यायालयात नवा दावा केला आहे. १८ एप्रिल २०२५ रोजी वळसंगकर यांनी आत्महत्या केली. वळसंगकर यांनी आयुष्य संपवण्याआधीपर्यंत पी राऊत नावाच्या महिलेचे त्यांना अनेक कॉल आले होते, असे वकिलांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर सीडीआर, टॉवर लोकेशन सादर करा असे आदेश न्यायाधीशांनी पोलिसांना दिले.
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणातील तपासात महत्त्वपूर्ण तांत्रिक पुरावे उजेडात आणण्यासाठी संबंधित मोबाईल कंपन्यांना डॉ. वळसंगकर तसेच इतर सहा व्यक्तींचे विस्तृत सीडीआर आणि टॉवर लोकेशन न्यायालयात सादर करण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश जयदीप मोहिते यांनी दिले.आत्महत्येपूर्वी डॉ. शिरीष यांनी साक्षीदार पी. राऊत यांच्याशी तीनवेळा संपर्क साधला होता, तसेच १६ ते १८ एप्रिलदरम्यान एका मोबाईल नंबरवर त्यांनी तब्बल दहावेळा संभाषण केले होते. या संभाषणाचा कालावधी मोठा होता, यामुळे त्या व्यक्तीची ओळख, त्या दिवसांत तो कुठे होता आणि त्या संवादांचे कारण तपासासाठी महत्त्वाचे ठरणार असल्याचे मनिषा मुसळे यांचे वकील प्रशांत नवगिरे यांनी न्यायालयासमोर मांडले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड