
नाशिक, 11 डिसेंबर (हिं.स.) : नाशिक महापालिकेच्या राष्ट्रीय फेरीवाला धोरण विभागातील कनिष्ठ लिपिक राजेंद्र पांडुरंग भोरकडे (वय ५२ ) याला सात हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी ( दि.११) रंगेहाथ पकडले. अतिक्रमण विभागाने उचलून नेलेली स्नॅक्सची हातगाडी सोडण्याच्या बदल्यात ही रक्कम मागितल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या मुख्यालयातच झालेल्या या कारवाईमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.
तक्रारदाराच्या भावाची स्नॅक्सची हातगाडी अतिक्रमण विभागाने जप्त केली होती. ती सोडवून देण्यासाठी तसेच दिव्यांग असलेल्या भावाची गाडी अमृतधाम येथील हॉकर झोनमध्ये बसवून देण्याची विनंती तक्रारदाराने केली होती. यावर संशयित भोरकडे यांनी १८ हजार रुपये दंड सांगत, दंड न भरता ९ हजार रुपये देण्याची मागणी केली. तडजोडीअंती सात हजार रुपये देण्याचे ठरले.तथापि, तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. गुरुवारी ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने मनपा मुख्यालयातील फेरीवाला कार्यालयाजवळील पुरुष प्रसाधनगृहात रक्कम देताच, भोरकडे यांना पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी, पोहवा विनोद चौधरी आणि अनिल गांगोडे यांनी केली.
शिक्षणाधिकारी धनगर घटनेला उजाळा
यापूर्वीही लाचलुचपत विभागाने मनपाच्या शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांना लाच घेताना अटक केली होती. त्यानंतर पुन्हा मनपा कर्मचाऱ्यावर झालेल्या या कारवाईमुळे धनगर प्रकरणा च्या घटनेलामहापालिकेत उजाळा मिळाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV