१४ रौद्र सायलन्सर एका फटक्यात संपले; पनवेलकरांची सुटका
रायगड, 12 डिसेंबर (हिं.स.)। पनवेलमध्ये ''फटाकडी गँग''ची मस्ती जिरवली; १४ बुलेटच्या सायलन्सरवर फिरवला ‘बुलडोझर’ वडाळे तलाव – व्ही. के. हायस्कुल परिसरात शहर पोलिसांची धडक कारवाई; टवाळखोरांचे धाबे दणाणले आहेत. पनवेल : शहरातील निसर्गरम्य आणि शांतत
14 Raudra Silencers ended in one blow; Panvel residents rescued


रायगड, 12 डिसेंबर (हिं.स.)। पनवेलमध्ये 'फटाकडी गँग'ची मस्ती जिरवली; १४ बुलेटच्या सायलन्सरवर फिरवला ‘बुलडोझर’

वडाळे तलाव – व्ही. के. हायस्कुल परिसरात शहर पोलिसांची धडक कारवाई; टवाळखोरांचे धाबे दणाणले आहेत.

पनवेल : शहरातील निसर्गरम्य आणि शांततेसाठी ओळखल्या जाणाऱ्या वडाळे तलाव परिसरात ‘फटाकडी गँग’ म्हणून ओळखले जाणारे मॉडिफाइड बुलेट रायडर्स कर्णकर्कश आवाज करत दहशत माजवत होते. अखेर नागरिकांच्या सततच्या तक्रारींनंतर पनवेल शहर पोलिसांनी या मस्तीबाजांवर मोठी धडक कारवाई करून अक्षरशः त्यांची ‘बोलती बंद’ केली. यात जप्त केलेले तब्बल १४ मॉडिफाइड सायलन्सर भररस्त्यात मांडून बुलडोझरच्या सहाय्याने ध्वस्त करण्यात आले. या कारवाईनंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

गेल्या काही दिवसांपासून तलाव परिसरात तसेच व्ही. के. हायस्कुलजवळ संध्याकाळच्या सुमारास बाईक रायडर्सचा सुळसुळाट वाढला होता. कानठळ्या बसवणाऱ्या आवाजात धावणाऱ्या बाईक्समुळे फिरायला येणाऱ्या नागरिकांमध्ये भीती व त्रासाचे वातावरण निर्माण झाले होते. ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी यांना अक्षरशः धडकी भरत असल्याने नागरिकांनी पोलिसांकडे वारंवार तक्रारी केल्या.

या संतापाची गंभीर नोंद घेत पोलीस उपायुक्त (DCP) प्रशांत मोहिते यांनी तात्काळ कठोर कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) भाऊसाहेब ढोले आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम हाती घेण्यात आली. पथकाने सापळा रचून आवाज करणाऱ्या १४ बाईकर्सना पकडले. सर्वांवर दंडात्मक कारवाईही झाली. मात्र पुन्हा अशा प्रकारची धमाल सुरू होऊ नये म्हणून पोलिसांनी जप्त सायलन्सरवर बुलडोझर फिरवून त्यांचा पूर्णतः चुराडा केला.

“शांतता भंग करणाऱ्यांना अजिबात सोडले जाणार नाही. पालकांनी मुलांच्या वाहनांवर लक्ष ठेवावे, अन्यथा कठोर कारवाई पुढेही सुरू राहील,” असा इशारा वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी दिला. या कारवाईचे शहरभरातून स्वागत होत असून, “आता तरी सायलन्सरचा दहशतीचा आवाज थांबेल,” अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande