
जळगाव, 12 डिसेंबर (हिं.स.) | शहराच्या गजबजलेल्या गोलाणी मार्केटमध्ये गुरुवारी मध्यरात्री अचानक लागलेल्या आगीने दोन मोबाईल दुकाने जळून खाक झाली. रात्री साधारण बारा वाजेच्या सुमारास झालेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
अग्निशामक दलाच्या एका बंबाच्या साहाय्याने आग नियंत्रणात आणण्यात आली. तळमजल्यावरील वाहेगुरू मोबाईल्स आणि त्याच्या शेजारील तिरुमला इंटरप्रायजेस या दोन दुकानांत शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. घटनेच्या वेळी परिसरात उपस्थित असलेल्या महेश पाटील यांनी तात्काळ महापालिका अग्निशमन दलाला संपर्क साधत परिस्थितीची माहिती दिली. पेट घेतलेल्या आगीत फर्निचर, इलेक्ट्रॉनिक साहित्य, मोबाईल्स, अॅक्सेसरीज यांसह सर्व वस्तू राख झाली. दुकानाचे मालक बंटी शर्मा यांना माहिती मिळताच ते घटनास्थळी येत असताना त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला.
वाहेगुरू मोबाईल्स हे बंटी शर्मा, सुनील शर्मा आणि विकी शर्मा ही तिघे भाऊ एकत्रितपणे चालवत होते. आग विझविण्याच्या कामात महानगरपालिकेचे वाहनचालक संतोष तायडे, फायरमन रोहिदास चौधरी, ऋषभ सुरवाडे, यश मनोरे, गणेश महाजन आणि चेतन सपकाळे यांनी विशेष परिश्रम घेतले. नागरिकांनीही तत्परतेने मदत केल्यामुळे आगीचा विस्तार रोखता आला आणि इतर दुकानांना मोठे नुकसान होण्यापासून बचाव झाला. या दुर्घटनेमुळे दुकान मालकांना मोठा आर्थिक फटका बसला असून जळगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर