
अमरावती, 12 डिसेंबर (हिं.स.)
चांदूर रेल्वे उपविभागीय पोलीस कार्यालयात अत्याधुनिक मोबाइल फॉरेन्सिक व्हॅनचे लोकार्पण अमरावती विभागाचे पोलिस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांच्या हस्ते व पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांच्या उपस्थितीत गुरुवारी संपन्न झाले. यावेळी उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाला उपस्थित पोलिस दलाने मान्यवरांना मानवंदना दिली. विधीवत पूजन करून मोबाइल फॉरेन्सिक व्हॅनचे उद्घाटन करण्यात आले.
नवीन फॉरेन्सिक व्हॅनमुळे गुन्हे तपासात अधिक अचूकता व वेग येणार असल्याचे पोलिस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांनी यावेळी सांगितले. पूर्वी गुन्ह्याच्या तपासात पुरावे संकलन प्रक्रियेत त्रुटी राहिल्याने न्यायालयीन निर्णयावर परिणाम होत असे. मात्र, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या या व्हॅनमुळे घटनास्थळी तत्काळ पंचनामा करता येईल तसेच न्यायवैद्यकीय, भौतिक, रासायनिक, जैविक व डिजिटल अशा सर्व प्रकारचे पुरावे वैज्ञानिक पद्धतीने गोळा करता येणार आहेत. या व्हॅनमध्ये प्रशिक्षित टेक्निशियन, आवश्यक रसायने, आधुनिक तपास उपकरणे उपलब्ध असून उपविभागातील सर्व पोलिस ठाण्यांना ही सुविधा मिळणार आहे. या यंत्रणेच्या वापरामुळे तपास अधिक सुलभ होऊन सात वर्षांपर्यंतच्या शिक्षेच्या गुन्ह्यांत दोषींना शिक्षा होण्याचे प्रमाण निश्चितच वाढेल, असा विश्वास रामनाथ पोकळे यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला अमरावती ग्रामीणचे पोलिस अधीक्षक विशाल आनंद, डीवायएसपी दिनेश शेळके, उपविभागीय अधिकारी अनिल पवार, चांदूर रेल्वेचे ठाणेदार अजय आकरे आदी पोलिस अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते..
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी