नादुरुस्त डीपीचा कहर! शिरजगाव मोझरीत उसासह तुरीचे पीक राख – शेतकरी घाटोळ यांचे साडेतीन लाखांचे नुकसान
अमरावती, 12 डिसेंबर (हिं.स.) वीज विभागाच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकट कोसळले आहे. मौजा शिरजगाव मोझरी येथे नादुरुस्त डीपीमुळे उस, तूर आणि ठिबक सिंचनास आग लागून शेतकरी प्रभाकर घाटोळ यांचे तब्बल ३.५० लाखांचे प्रचंड नुकसान झाले. गे
नादुरुस्त डीपीचा कहर! शिरजगाव मोझरीत उसासह तुरीचे पीक राख – शेतकरी घाटोळ यांचे साडेतीन लाखांचे नुकसान


अमरावती, 12 डिसेंबर (हिं.स.)

वीज विभागाच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकट कोसळले आहे. मौजा शिरजगाव मोझरी येथे नादुरुस्त डीपीमुळे उस, तूर आणि ठिबक सिंचनास आग लागून शेतकरी प्रभाकर घाटोळ यांचे तब्बल ३.५० लाखांचे प्रचंड नुकसान झाले. गेल्या अनेक दिवसांपासून घाटोळ डीपी नादुरुस्त असून त्याच्या मेंटनन्सबाबत शेतकऱ्यांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या. तरीही विद्युत विभागाने कोणतीही दखल न घेतल्याने अखेर डीपीतून उसळलेल्या स्पार्कने बुधवारी सायंकाळी ४.३० वाजता ऊस व तुरीचे पीक भस्मसात केले.

खरिपात अतिवृष्टीने पिके वाहून गेलेली… आर्थिक संकटाने ग्रासलेला शेतकरी… आणि त्यातच शेतीतील नव्या प्रयोगातून ऊस पिकवून उभा केलेला आशेचा पीक. हे पीक काही दिवसांत काढणीस येणार होते. परंतु नादुरुस्त डीपीच्या स्पार्कने शेतकऱ्याच्या हातातला तोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला. ठिबक सिंचनाचा महागडा संचदेखील आगीत जळून खाक झाला.घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी प्रशासनाला देताच उपकार्यकारी अभियंता गणेश नाईक, तलाठी माळोदे, कृषी सेवक कुंभारे यांनी घटनास्थळाचे पंचनामे केले. पंचनाम्यानंतर नुकसानभरपाईचा प्रस्ताव तातडीने पुढे पाठविण्याचे आश्वासन उपकार्यकारी अभियंता निलेश उईके यांनी दिले आहे.शिरजगाव मोझरी, शिवणगाव, मालधूर, कोळवण, धोत्रा, वर्हा, माळेगाव, शेंदोळा बु. या परिसरात अनेक डीपी नादुरुस्त असून त्यातून ऑइल गळती व स्पार्किंगच्या घटना नियमित घडत असल्याचा आरोप स्थानिकांचा आहे. भविष्यात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून विद्युत विभागाने तातडीने दुरुस्ती मोहिम राबविण्याची जोरदार मागणी होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande