
रायगड, 12 डिसेंबर (हिं.स.)। महिलांवरील वाढत्या हिंसाचाराविरोधात जनजागृती निर्माण करण्यासाठी ‘ऑरेंज द वर्ल्ड’ या आंतरराष्ट्रीय मोहिमेअंतर्गत पनवेलमध्ये भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. इनरव्हील क्लब ऑफ पनवेल सिटी, वीर वुमेन्स फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल सिटी या तीन सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने तसेच पनवेल शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या विशेष सहकार्याने ही रॅली पार पडली.
महिलांच्या सुरक्षेसंदर्भात जनजागृती करण्यासाठी पोलिसांनी दाखवलेली तत्परता उल्लेखनीय होती. रॅली सुरळीतपणे पार पाडण्यासाठी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील व त्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. इनरव्हील क्लब ही विविध स्तरातील महिलांना एकत्र आणून समाजहिताच्या उपक्रमांना गती देणारी संस्था असून, या वर्षी क्लबने ‘ऑरेंज द वर्ल्ड’ हा जागतिक थीम स्वीकारला आहे.
वडाळे तलाव येथून रॅलीचा शुभारंभ झाला. पोलिसांच्या बाईक पथकाने रॅलीचे नेतृत्व केले, तर सहभागी महिला त्यांच्यामागे शिस्तबद्ध पद्धतीने पायी चालत होत्या. वडाळे तलाव – ज्येष्ठ नागरिक हॉल – म्युनिसिपल कॉर्पोरेशन – जयभारत नाका – शिवाजी पुतळा – आंबेडकर पुतळा – पनवेल बस स्टँड अशी मार्गक्रमणा करत रॅली पुन्हा वडाळे तलाव येथे दाखल झाली.
रॅलीनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सारिका झांजुर्णे यांनी महिलांना स्वसंरक्षणाचे तंत्र, संकटसमयी घ्यायची काळजी आणि सुरक्षिततेसंदर्भातील महत्त्वाचे मुद्दे समजावून सांगितले. कोणतीही नारेबाजी न करता बॅनरच्या माध्यमातून संदेश देत रॅली शांततेत पार पडली.
‘ऑरेंज’ रंगाच्या ड्रेस कोडमुळे रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. उपस्थितांमध्ये अर्चना ठाकुर, क्लब प्रेसिडेंट सिंपल आंचलिया, सेक्रेटरी युक्ती शाह, पीपी ध्वनी तन्ना, आयपीपी प्रतिभा डांगी, खजिनदार ममता ठक्कर, एडिटर मौसमी गोगुला, जॉईंट सेक्रेटरी वैशाली कटारिया, सीसी प्रिया चतुर्वेदी आणि इतर सदस्य तसेच वीर वुमेन्स फाउंडेशनच्या पुनम जैन, श्रुति निस्सर, सीमा जैन आणि रोटरी क्लबचे हर्मेश तन्ना, रोहित जाधव, दिप्ती जाधव उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके