विधिमंडळात प्रवेशासाठी पासेसची दीड हजारात विक्रीचा आरोप, चौकशीचे आदेश
नागपूर, 12 डिसेंबर (हिं.स.) : नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात अभ्यागतांना प्रवेश देणारे पास दीड हजार रुपयांत विकले जात आहेत, असा गंभीर आरोप शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केला. या प्रकारांमुळे दहशतवादीही सहज आत शिर
विधिमंडळात प्रवेशासाठी पासेसची दीड हजारात विक्रीचा आरोप, चौकशीचे आदेश


नागपूर, 12 डिसेंबर (हिं.स.) : नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात अभ्यागतांना प्रवेश देणारे पास दीड हजार रुपयांत विकले जात आहेत, असा गंभीर आरोप शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केला. या प्रकारांमुळे दहशतवादीही सहज आत शिरू शकतात, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश तालिका सभापती कृपाल तुमाने यांनी दिले आहेत.

गेल्या वर्षी काही आमदारांच्या तक्रारीनंतर अभ्यागतांसाठी दररोजचे प्रवेश पास देण्यावर बंदी घालण्यात आली होती. तसेच विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनीही हिवाळी अधिवेशन सुरू होताच सर्व सदस्यांना पासशिवाय कोणालाही विधानभवन परिसरात आणू नये, असे स्पष्ट निर्देश दिले होते. मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दोन दिवसांत २३ आमदारांनी विनापास लोकांना आत नेल्याचे उघड झाले होते.

आता हिवाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी (१२ डिसेंबर) शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी थेट विधान परिषदेत हा मुद्दा उपस्थित करीत खळबळ उडवून दिली. ते म्हणाले, “माझ्या कार्यकर्त्यांकडे आमदारांचे पत्र असूनही त्यांना पास मिळाले नाहीत आणि ते दिवसभर बाहेर उभे होते. पण बाहेर दीड हजार रुपये देऊन पास मिळत आहेत. ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. अशा पद्धतीने विधिमंडळाची सुरक्षा धोक्यात आली आहे. दीड हजारात पास मिळत असेल तर दहशतवादी कधीही आत येऊ शकतो. कुणी पैसे घेऊन हे पास जारी केले, याची चौकशी व्हावी”, अशी मागणी त्यांनी केली.

हेमंत पाटील यांच्या आरोपानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही आक्रमक भूमिका घेतली. ते म्हणाले, “अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच मर्यादित पास देण्याचे सांगितले होते. मात्र आज विधिमंडळ परिसरात एवढी गर्दी आहे की नीट चालता येत नाही. हे सगळे लोक आत कसे आले? इतक्या मोठ्या प्रमाणात पास कुणी आणि का जारी केले?”असे सवाल त्यांनी केले. दोन्ही आमदारांच्या मागणीनंतर तालिका अध्यक्ष कृपाल तुमाने यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande