
अमरावती, 13 डिसेंबर (हिं.स.)
अमरावती जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रमांतर्गत शिक्षक, शाळा व केंद्रप्रमुखांचा त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल जिल्हातील २७शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
हा कार्यक्रम जिल्हा परिषद अमरावती व ओपन लिंक्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय शिक्षणात गुणवत्ता, नवोपक्रम आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर वाढविण्याच्या उद्देशाने राबविला जात आहे. कार्यक्रमातील मुख्य आकर्षण म्हणजे शिक्षकांनी आपल्या शाळेत राबविलेल्या नवोपक्रमांचे विनोबा पवर शेअरिंग,तसेच महिन्याला उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा तालुका व जिल्हा स्तरावर सन्मान.याच कार्यक्रमात मिशन १०० अंतर्गत ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती सराव चाचणी २ मधील जिल्ह्यातील टॉप ६ शाळांना देखील गौरविण्यात आले. तसेच विनोबा पवरील लीडरबोर्डमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षक, शाळा, केंद्रे व केंद्रप्रमुखांनाही विशेष सन्मान प्रदान करण्यात आला.या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी महापात्र यांनी शिक्षकांना तंत्रज्ञानाचा प्रभावी आणि समृद्ध शिक्षणासाठी आवश्यक वापर करण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी आपल्या शाळाभेटीतील अनुभव शेअर करत शिक्षकांना विद्यार्थ्यांना अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने कार्य करण्याचा संदेश दिला. कार्यक्रमास शिक्षणाधिकारी (प्रा.) सतीश मुगल, उपशिक्षणाधिकारी (परीक्षाविधी) प्रेरक उजगारे, श्वेता गोळे, शिक्षण विस्तार अधिकारी प्रवीण खांडेकर, जिल्हा प्रकल्प अधिकारी सागर गजभिये, उत्कर्ष मेश्राम तसेच २७ शिक्षक आणि केंद्रप्रमुख उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी