तिवस्यातून जाणार्‍या महामार्गावर अपघात वाढले; उपायोजनांसासाठी अधिकार्‍यांची संयुक्त पाहणी
अमरावती, 13 डिसेंबर (हिं.स.)। तहसील कार्यालयातील महिला कर्मचार्‍याचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर महसूलचे अधिकारी जागे झाले आणि महामार्गावरील वाहतूक व्यवस्थेच्या सुधारणेच्या दृष्टीने शुक्रवारी शहरातून जाणार्‍या संपूर्ण रस्त्याची संयुक्त पाहणी केली. ति
तिवस्यातून जाणार्‍या महामार्गावर अपघात वाढले उपायोजनांसासाठी अधिकार्‍यांची संयुक्त पाहणी


अमरावती, 13 डिसेंबर (हिं.स.)।

तहसील कार्यालयातील महिला कर्मचार्‍याचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर महसूलचे अधिकारी जागे झाले आणि महामार्गावरील वाहतूक व्यवस्थेच्या सुधारणेच्या दृष्टीने शुक्रवारी शहरातून जाणार्‍या संपूर्ण रस्त्याची संयुक्त पाहणी केली. तिवसा शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या अपघातांची मालिका नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे.

चौपदरीकरण पूर्ण झाल्यानंतरही अपघातांचे प्रमाण नियंत्रणात येण्याऐवजी सातत्याने वाढत आहे. विशेषतः तिवसा बसस्थानक परिसर हा अपघातांचा हॉटस्पॉट बनला असून, काही दिवसांपूर्वीच तहसील कार्यालयातील एका महिला कर्मचार्‍याचा या ठिकाणी झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. यापूर्वीही याच ठिकाणी दुचाकीला अचानक पेट लागून एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या वारंवार घडणार्‍या दुर्घटनांच्या पृष्ठभूमीवर नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी असून सुरक्षिततेबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी अधिक तीव्र झाल्याने वाढत्या अपघातांमुळे विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला निवेदने दिली. या संदर्भात तिवसा शहरातील मुख्य चौकात बसस्थानकासमोर आणि पेट्रोल पंप चौकात स्पीडब्रेकर्स व झेब्रा क्रॉसिंग बसविण्याची ठोस मागणी करण्यात आली. दोन्ही ठिकाणी दिवसभर मोठी वर्दळ असून वाहतूक नियंत्रणाची कोणतीही प्रभावी साधने नसल्याने अपघाताचा धोका वाढत आहे.

ही परिस्थिती लक्षात घेऊन तिवसा तहसीलदार डॉ. मयूर कळसे यांनी स्वतः भेट देऊन संयुक्त पाहणी केली. त्यांच्यासोबत नायब तहसीलदार नरेंद्र कुरळकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अनुराग खडसे, तिवसा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल तुळजेवार, तिवसा बसस्थानक प्रमुख प्रतीक मोहोळ तसेच आयआरबीचे मुख्य अभियंता प्रवीण नागपुरे तसेच सचिन राऊत उपस्थित होते. संयुक्त पाहणीनंतर तहसीलदार डॉ. मयुर कळसे यांनी आयआरबीचे महाव्यवस्थापक रवींद्र चोरे यांना पंचवटी चौक, पेट्रोल पंप चौक आणि बसस्थानक चौक या महत्त्वाच्या ठिकाणी तात्काळ गतिरोधक, झेब्रा क्रॉसिंग, वाहतूक चिन्हे, तसेच इतर सुरक्षाविषयक आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. सोबतच तिवसा बसस्थानकासमोरील भागातील नाली रुंदीकरण करून देण्याचे आश्वासन दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande