जळगाव - बीएलओ संयुक्त मोहिमेने दुबार मतदारांचा शोध
जळगाव, 13 डिसेंबर (हिं.स.) शहरातील मतदार यादीत आढळून आलेल्या दुबार नावांचा शोध घेणे महापालिका प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरत असून, आजपासून मनपाचे पथक आणि बीएलओ (बूथ लेव्हल ऑफिसर) संयुक्तपणे तपासणी मोहीम राबवणार आहेत. तीन दिवसांत तब्बल सुमारे ३३ हजार
जळगाव - बीएलओ संयुक्त मोहिमेने दुबार मतदारांचा शोध


जळगाव, 13 डिसेंबर (हिं.स.) शहरातील मतदार यादीत आढळून आलेल्या दुबार नावांचा शोध घेणे महापालिका प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरत असून, आजपासून मनपाचे पथक आणि बीएलओ (बूथ लेव्हल ऑफिसर) संयुक्तपणे तपासणी मोहीम राबवणार आहेत. तीन दिवसांत तब्बल सुमारे ३३ हजार दुबार नावांचे शुद्धीकरण करण्याचे लक्ष्य प्रशासनासमोर आहे. याआधी लेखी आदेश नसल्याने बीएलओंकडून अपेक्षित सहकार्य मिळत नव्हते; मात्र प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी शुक्रवारी लेखी आदेश जारी केल्याने मोहिमेला गती मिळाली आहे महानगरपालिका निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रारूप मतदार यादीत सुमारे १६ हजार मतदारांची नावे दोन किंवा त्यापेक्षा अधिक ठिकाणी नोंदलेली असल्याचे निदर्शनास आले. परिणामी एकूण ३३,७७० दुबार नावे समोर आली आहेत. या दुबार नोंदींचा गैरवापर करून बोगस मतदान होऊ नये, यासाठी प्रशासनाने यादी शुद्धीकरणाची युद्धपातळीवरील मोहीम हाती घेतली आहे. दोन किंवा अधिक ठिकाणी नाव असलेल्या मतदारांकडून नेमके कुठे मतदान करणार आहेत, याबाबत हमीपत्रही भरून घेतले जाणार आहे. तीन दिवसांपूर्वी मनपाच्या उपायुक्त निर्मला गायकवाड व धनश्री शिंदे यांनी शहरातील ३५८ बीएलओंची बैठक घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. मात्र लेखी आदेशाअभावी अंमलबजावणीत अडथळे येत होते. आता प्रांताधिकारी गोसावी यांच्या स्पष्ट आदेशानुसार बीएलओंना त्यांच्या प्रभागातील दुबार नावे शोधणे, प्रत्यक्ष तपासणी करणे आणि आवश्यक पुरावे संकलित करणे हे काम मनपा कर्मचाऱ्यांसोबत संयुक्तपणे करावे लागणार आहे. प्रारूप मतदार याद्यांतील तपासणीत धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. एका महिलेचे नाव तब्बल १७ वेगवेगळ्या मतदार याद्यांत, तर दुसऱ्या महिलेचे नाव १४ वेळा नोंदलेले आढळून आले आहे. अनेक मतदारांच्या नोंदींमध्ये पूर्ण पत्ता नसल्याने त्यांचा शोध घेणे कठीण जात असून, त्यामुळे तपासणी अधिक किचकट ठरत आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १५ डिसेंबर रोजी त्रुटी दूर करून अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे. त्यासाठी मनपा प्रशासनाकडून युद्धपातळीवर काम सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande