
सीआयआय अन्न प्रक्रिया परिषदेत केले आवाहन
नागपूर, 13 डिसेंबर (हिं.स.) : कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) वेस्टर्न रिजनतर्फे नागपूर येथे आयोजित CII WR नॅशनल फूड प्रोसेसिंग समिट 2025 यशस्वीरीत्या पार पडली. या परिषदेमध्ये शेतीला तंत्रज्ञानाधारित, मूल्यवर्धित आणि भविष्यकालीन ऍग्री-बिझनेस इकोसिस्टिममध्ये रूपांतरित करण्याचा ठाम संदेश देण्यात आला.
परिषदेला संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, शेती ही केवळ उत्पादनापुरती मर्यादित न राहता मूल्यनिर्मिती, रोजगारनिर्मिती आणि ग्रामीण व निमशहरी भागात समृद्धी घडवून आणणारी एकात्मिक अॅग्री-बिझनेस प्रणाली बनली पाहिजे. अन्न प्रक्रिया क्षेत्राच्या माध्यमातून शेतकरी, उद्योग आणि नवोन्मेष यांचा संगम साधता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांनी राज्य शासनाच्या महाॲग्री-एआय पॉलिसी 2025–2029 विषयी माहिती देत हवामानस्नेही शेती, बाजार माहिती, निर्यात सज्जता आणि संपूर्ण कृषी मूल्यसाखळीत कृत्रिम बुद्धिमत्ता व डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याचे सांगितले. कोल्ड चेन, साठवणूक व लॉजिस्टिक्स सुविधा बळकट करण्यात येत असून सूक्ष्म व मध्यम अन्न प्रक्रिया उद्योगांना भांडवली अनुदान, व्याज सवलत आणि ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञानासाठी प्रोत्साहन दिले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजना व PMFME योजनेअंतर्गत आतापर्यंत 26,781 सूक्ष्म व 766 मध्यम प्रकल्पांना चालना मिळून सुमारे ₹5,242 कोटींची गुंतवणूक आकर्षित झाल्याची माहिती देण्यात आली. शेतकरी सक्षमीकरण, महिलांच्या नेतृत्वाखालील उद्योग आणि शाश्वत शेती यावर विशेष भर देण्यात आला.
परिषदेत उद्योग, स्टार्टअप्स आणि तज्ज्ञांनी नवोन्मेष, अॅग्री-टेक, एकात्मिक मूल्यसाखळी व गुंतवणूक संधींवर सखोल चर्चा केली. शासन, उद्योग आणि नवोन्मेषक यांच्यातील सहकार्य वाढवून महाराष्ट्राला जागतिक अन्न प्रक्रिया केंद्र म्हणून विकसित करण्याच्या संकल्पाने परिषदेचा समारोप झाला.-------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis