
मुंबई , 14 डिसेंबर (हिं.स.)। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘जल्लाद’ असा उल्लेख करणे म्हणजे अविवेकी आणि केवळ प्रसिद्धीसाठी केलेले राजकारण आहे, अशी तीव्र टीका भाजपाचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली आहे.
“देवेंद्र फडणवीस हे लोकशाही मार्गाने, जनतेच्या मतातून निवडून आलेले मुख्यमंत्री आहेत. त्यांना ‘जल्लाद’ म्हणणे म्हणजे राज्यातील कोट्यवधी जनतेचा थेट अपमान आहे. या वक्तव्याबद्दल हर्षवर्धन सपकाळ यांनी आधी जनतेची जाहीर माफी मागावी आणि स्वतःची पात्रता तपासून घ्यावी,” असे कुलकर्णी म्हणाले.
विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याच्या नियुक्तीबाबत बोलताना कुलकर्णी म्हणाले, “विरोधी पक्षनेता हा राज्य सरकारच्या इच्छेने नाही तर विधानसभा नियमांनुसार ठरतो. एकूण आमदारांच्या किमान दहा टक्के संख्याबळाशिवाय हे पद मिळू शकत नाही, ही साधी माहितीही हर्षवर्धन सपकाळ यांना नाही. काँग्रेसकडे आवश्यक संख्याबळ नसल्याने जनतेनेच त्यांना हे पद नाकारले आहे.”
“या पदासाठी कितीही बोंबलले तरी संविधान आणि नियम बदलत नाहीत. त्यामुळे विरोधी पक्षनेता मिळू शकत नाही, हा वास्तव स्वीकारावा,” असा ठाम दावा राम कुलकर्णी यांनी केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर