
रत्नागिरी, 14 डिसेंबर, (हिं. स.) : पावस येथील श्री स्वामी स्वरूपानंद जन्मोत्सवाचे औचित्य साधून आज रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे अध्यात्म मंदिर ते पावस येथील समाधी मंदिर अशी सायकल दिंडी उत्साहात काढण्यात आलली. यंदा या दिंडीचे पाचवे वर्ष होते.
ओम राम कृष्ण हरी नामगजर करत सुमारे ४० किमीच्या या दिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वरची आळी येथील स्वामी स्वरूपानंद अध्यात्म मंदिर येथून सायकल दिंडी सुरू झाली. ती भाट्ये, फणसोप, गोळपमार्गे पावसला समाधी मंदिरापर्यंत पोहोचली. या मार्गावर दरवर्षी जन्मोत्सवानिमित्त रत्नागिरी ते पावस या पायी दिंडीतील वारकऱ्यांचीही भेट झाली. सायकल चालवू या, प्रदूषण टाळू या, पर्यावरण जपू या, असा संदेश या दिंडीतून देण्यात आला. विशेष म्हणजे रत्नागिरी सायकलिस्ट क्लब व कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनच्या सदस्यांनीही रत्नागिरी ते पावस हे अंतर धावत पार केले.
समाधी मंदिरात स्वामींचे दर्शन घेतल्यानंतर स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष जयंतराव देसाई यांनी सर्व सायकलस्वारांचे स्वागत करून अभिनंदन केले. त्यांनी क्लबला नवनवीन उपक्रम राबवण्यासाठी प्रोत्साहन दिले. सेवा मंडळाने सायकलपटूंच्या अल्पोपाहाराची व्यवस्था केली. त्यानंतर सायकलस्वार पुन्हा रत्नागिरीत परतले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी