
नागपूर, १४ डिसेंबर (हिं.स.) : ठाणे शहरातील ४२ मीटर रस्त्यावर एकाच वेळी सुरू असलेली नळपाणी योजना, मेट्रो व फ्लायओव्हरची कामे आणि वाढती वाहतूक यामुळे निर्माण झालेल्या कोंडीवर राज्य शासनाने टप्प्याटप्प्याने उपाययोजना आखल्या असल्याची माहिती राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानपरिषदेत दिली.
सदस्य अॅड. निरंजन डावखरे यांनी ठाणे शहरातील घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी विषयी लक्षवेधी सूचना मांडली. यावर राज्यमंत्री कदम हे उत्तर देताना बोलत होते.
राज्यमंत्री कदम म्हणाले की, सर्विस रोडवरील नळपाणी योजनेची कामे फेब्रुवारी २०२६ पर्यंत पूर्ण होणार असून, त्यानंतर सर्विस रोड पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला होईल. रस्त्याच्या मध्यभागी सुरू असलेले मेट्रोचे काम एप्रिल २०२६ पर्यंत पूर्ण होण्याचे नियोजन आहे.
सर्विस रोड मर्ज करून रस्त्याची रुंदी वाढवण्याचे काम सुरू असून, त्यातील सुमारे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. एमएसआरडीसी व एमएमआरडीए मार्फत खाडीगाव बायपास आणि गायमुख – घाट सेक्शनचे काम हाती घेण्यात आले असून, हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या रस्त्यावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा विश्वास राज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी