आदिवासी विकास विभागाच्या विभागीय क्रीडा स्पर्धा व विज्ञान प्रदर्शनीचे उत्साहात उद्घाटन
चंद्रपूर, 13 डिसेंबर (हिं.स.)। आदिवासी विकास विभाग, नागपूर यांच्या वतीने आयोजित विभागीय क्रीडा स्पर्धा–2025 व विभागीय विज्ञान प्रदर्शनीचे भव्य उद्घाटन अपर आयुक्त आयुषी सिंह यांच्या हस्ते आज जिल्हा क्रीडा संकुल, चंद्रपूर येथे पार पडले. या कार्यक्र
आदिवासी विकास विभागाच्या विभागीय क्रीडा स्पर्धा व विज्ञान प्रदर्शनीचे उत्साहात उद्घाटन


चंद्रपूर, 13 डिसेंबर (हिं.स.)।

आदिवासी विकास विभाग, नागपूर यांच्या वतीने आयोजित विभागीय क्रीडा स्पर्धा–2025 व विभागीय विज्ञान प्रदर्शनीचे भव्य उद्घाटन अपर आयुक्त आयुषी सिंह यांच्या हस्ते आज जिल्हा क्रीडा संकुल, चंद्रपूर येथे पार पडले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र समितीचे सहाय्यक आयुक्त रामचंद्र सोनकवडे, आदिवासी विकास विभाग नागपूरचे उपायुक्त दिगांबर चव्हाण, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, यांच्यासह विविध जिल्ह्यांतील प्रकल्प अधिकारी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी व आदिवासी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

या विभागीय क्रीडा स्पर्धांमध्ये नागपूर विभागातील नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, भामरागड, अहेरी, देवरी, भंडारा व चिमूर या ९ एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतील सुमारे ३००० विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी सहभागी झाले आहेत. स्पर्धांचा कालावधी १३ ते १५ डिसेंबर २०२५ असा असून कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, हॅन्डबॉल तसेच ॲथलेटिक्समधील विविध प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. उद्घाटन समारंभात खेळाडूंनी संचलन, क्रीडा शपथ व क्रीडा ध्वज फडकावून क्रीडावृत्तीचे दर्शन घडविले. ढोल पथकाच्या सादरीकरणाने उपस्थितांचे लक्ष वेधले. तसेच बिरसा मुंडा, राणी दुर्गावती व बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून कार्यक्रमाची विधीवत सुरुवात करण्यात आली.

उद्घाटनप्रसंगी बोलताना आयुषी सिंह यांनी शासकीय आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी क्रीडा स्पर्धांचे महत्त्व अधोरेखित केले. क्रीडा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संघभावना, समन्वय व कार्यक्षमता वाढते, तसेच विज्ञान प्रदर्शनातून वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होते, असे त्यांनी नमूद केले.

या विभागीय क्रीडा स्पर्धांचा समारोप १५ डिसेंबर रोजी होणार असून, विजेत्या व उपविजेत्या संघांना तसेच वैयक्तिक खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande