गोदावरीसह तिच्या उपनद्यांच्या स्वच्छतेसाठी नागरिकांनी योगदान द्यावे - आयुक्त शेखर सिंह
नाशिक, 13 डिसेंबर (हिं.स.)। नाशिक, नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरीसह तिच्या उप नद्यांच्या स्वच्छतेसाठी आणि या नद्या बारमाही प्रवाही ठेवण्यासाठी नागरिकांचे योगदान महत्वाचे असून या उपक्रमात नागरिकांनी आपला सहभा
गोदावरीसह तिच्या उप नद्यांच्या स्वच्छतेसाठी नागरिकांनी योगदान द्यावे -  आयुक्त शेखर सिंह


नाशिक, 13 डिसेंबर (हिं.स.)।

नाशिक, नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरीसह तिच्या उप नद्यांच्या स्वच्छतेसाठी आणि या नद्या बारमाही प्रवाही ठेवण्यासाठी नागरिकांचे योगदान महत्वाचे असून या उपक्रमात नागरिकांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी केले.

कुंभमेळा विकास प्राधिकरणाच्या वतीने आज सायंकाळी कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात कुंभमेळ्यातील स्वच्छतेबाबत जनजागृतीसाठीस्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींसमवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर, उपायुक्त अजित निखत, त्र्यंबकेश्वर नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांच्यासह विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

आयुक्त श्री. सिंह म्हणाले की, कुंभमेळा कालावधीत देश विदेशातील भाविक नाशिक सह त्र्यंबकेश्वर येथे येतील. राज्य शासनाच्या माध्यमातून कुंभमेळा सुरक्षित, हरित आणि अपघात विरहित करण्यासाठी कुंभमेळा प्राधिकरण कटिबद्ध आहे. नाशिकसह त्र्यंबकेश्वर येथे स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील. त्यासाठी नागरिक, स्वयंसेवी संस्था यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन महत्वाचे आहे. स्वच्छतेसाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात येईल. यात स्वयंसेवी संस्था, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात येईल. गोदावरीसह तिच्या उपनद्या, धार्मिक, ऐतिहासिक पर्यटन स्थळे येथेही हा उपक्रम राबविण्यात येईल. आगामी काळात त्र्यंबकेश्वर येथे नागरिकांशी लवकरच संवाद साधण्यात येईल.

यावेळी त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानचे अध्यक्ष ॲड. सोमनाथ घोटेकर, निशिकांत पगारे, सुनील वैद्य, चेतन शेलार, प्रकाश बर्वे, संकेत मेंढेकर, आदींनी विविध सूचना केल्या. त्यांनी संगितले की, मागील वेळेस हरित कुंभचे नियोजन केले होते. दीड वर्षात विविध उपक्रम, गंगापूर गाव ते दसक पंचक पर्यंत स्वच्छता मोहीम राबवावी, प्लास्टिक वापराबाबत नदी परिसरातील विक्रेत्यांमध्ये जनजागृती करावी, तरुण, शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्यावे, नदीपात्रात केर कचरा टाकण्यास प्रतिबंध करावा, गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग घ्यावा, कचरा टाकण्याच्या ठिकाणी घंटा गाडी उपलब्ध ठेवावी, स्वच्छता गृह उपलब्ध असावेत, स्वच्छतेसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत, स्वच्छतेसाठी परवानगी प्रक्रिया सुलभ व्हावी, आदी सूचनांचा समावेश होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande