
अमरावती, 13 डिसेंबर, (हिं.स.)
दिवाळीपर्यंत सुरू राहिलेल्या अवकाळी पावसाने सोयाबीनचे पीक अक्षरशः वाहून नेले, आणि ज्या कापसावर शेतकऱ्यांनी शेवटची आशा ठेवली होती. त्यावरही आता बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. वर्षभर कर्ज काढून, लाखो रुपये खर्च करून, फवारण्या, सिंचन, खतांचा भार उचलत शेतकऱ्यांनी पीक वाढवले. शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झाली आहे, कापसावर केलेला खर्च निघेल की, नाही याचीही शाश्वती राहिलेली नाही. सततचे नैसर्गिक संकट, रोगराई आणि वाढते उत्पादनखर्च यांच्या ताणतणावांमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडला आहे. शिवाय कापसाच्या उत्पादनात देखील पन्नास टक्के घट होण्याची भिती देखील व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांतील अवकाळी पावसामुळे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आता कापसाच्या बोंडांमध्ये गुलाबी अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून चांगल्या उत्पादनासाठी शेतकरी रात्रंदिवस कष्ट करत आहेत. वेळी-वेळी फवारणी, सिंचन, खत खतांची मात्रा देणे अशा सर्व प्रक्रिया नियमितपणे केल्यामुळे कपासाची पीके चांगली वाढलेली दिसत होती. मात्र काही शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात कपासाच्या बोंडांवर गुलाबी अळीचा प्रादुर्भाव दिसत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी