
कोल्हापूर, 13 डिसेंबर (हिं.स.)
प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) व लायन्स क्लब, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने 9 ते 11 डिसेंबर या कालावधीत किणी टोलनाका येथे वाहन चालकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. तीन दिवस चाललेल्या या शिबिरात एकूण 345 वाहन चालकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली.
या शिबिरामध्ये वाहन चालकांची दृष्टीक्षमता तपासण्यात आली. यामध्ये जवळ व दूर दृष्टी चाचणी, रंग ओळख तपासणी तसेच इतर नेत्र आरोग्य तपासणी करण्यात आली.तपासणीदरम्यान विविध प्रकारचे नेत्रदोष आढळून आले असून दीर्घ पल्ल्याच्या वाहन चालकांमध्ये दृष्टीदोषाचे प्रमाण वाढत असल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदविले. शिबिरात तपासणी झालेल्या वाहन चालकांना आवश्यकतेनुसार आय ड्रॉपचेही वाटप करण्यात आले.
सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने वाहन चालकांच्या डोळ्यांची नियमित तपासणी अत्यंत महत्त्वाची असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. हे शिबिर यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी मोटार वाहन निरीक्षक लखनकुमार झुनके, विनायक सूर्यवंशी, योगेश कांबळे तसेच सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक ऋतुजा देसाई, ज्योती पाटील दडिडकर, गणपतराव माशाळकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर व सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रकांत माने यांनी शिबिरास भेट देऊन आयोजनाची पाहणी केली. वाहन चालकांच्या आरोग्यासाठी अशा उपक्रमांची नितांत आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
शिबिरात सहभागी झालेल्या वाहन चालकांनी या उपक्रमाचे कौतुक करत, अशा मोफत तपासणी शिबिरांचे नियमित आयोजन करण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar