घाणीच्या विळख्यातून मुक्तता; कामोठ्यात सामाजिक बांधिलकीचे उदाहरण
रायगड, 13 डिसेंबर (हिं.स.)। कामोठे वसाहतीतील सेक्टर २१ परिसरात अनेक दिवसांपासून साचलेल्या कचऱ्यामुळे व वाढलेल्या झुडपांमुळे नागरिकांचे आरोग्य व सुरक्षितता धोक्यात आली होती. ही गंभीर परिस्थिती शेतकरी कामगार पक्षाचे कार्याध्यक्ष गौरव पोरवाल यांच्या न
घाणीच्या विळख्यातून मुक्तता; कामोठ्यात सामाजिक बांधिलकीचे उदाहरण


रायगड, 13 डिसेंबर (हिं.स.)। कामोठे वसाहतीतील सेक्टर २१ परिसरात अनेक दिवसांपासून साचलेल्या कचऱ्यामुळे व वाढलेल्या झुडपांमुळे नागरिकांचे आरोग्य व सुरक्षितता धोक्यात आली होती. ही गंभीर परिस्थिती शेतकरी कामगार पक्षाचे कार्याध्यक्ष गौरव पोरवाल यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ हस्तक्षेप करत परिसर स्वच्छ करून दिल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

येथील सत्याम हाइट्स आणि महाकाली निवास सोसायटीलगत असलेल्या अनेक वर्षांपासून रिकाम्या पडलेल्या एमएसबीच्या प्लॉटमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा, झुडपे व रानगवत वाढले होते. त्यामुळे परिसरात सापांचा उपद्रव वाढला असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांना भीतीच्या वातावरणात वावर करावा लागत होता. स्थानिक रहिवाशांनी या संदर्भात शेकाप कार्याध्यक्ष गौरव पोरवाल यांच्याकडे थेट तक्रार मांडली.

तक्रार प्राप्त होताच पोरवाल यांनी तत्काळ एमएसबी व सिडकोच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कारवाईची मागणी केली. मात्र संबंधित विभागांनी एकमेकांवर जबाबदारी ढकलत कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत. अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन गौरव पोरवाल यांनी स्वतःच्या खर्चातून संपूर्ण प्लॉटची स्वच्छता करून घेतली.या स्वच्छता मोहिमेमुळे कचरा, झुडपे तसेच सापांचे संभाव्य अधिवास पूर्णतः नष्ट करण्यात आले असून परिसर पुन्हा स्वच्छ व सुरक्षित झाला आहे. त्यांच्या या तत्पर, जबाबदार आणि सामाजिक भान जपणाऱ्या कार्याचे स्थानिक नागरिकांनी मनःपूर्वक कौतुक करत आभार व्यक्त केले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande